खेड : खाडीपट्टा भागात खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा कोलमडली

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागात बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा पुरता बोजवाराच उडाला आहे. कोणत्याही क्षणी दिवसभर मोबाईल सेवेत येणाऱ्या व्यत्ययाचा ग्राहकांना फटका बसत आहे. सेवेतील व्यत्यय दूर करण्यासाठी कुठलीच ठोस पावले उचलली जात नसल्याने ग्राहकांची हेळसांड कायमच आहे.

कोलमडणाऱ्या सेवेबाबत तक्रार करायची तरी कुठे, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे. बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांनी ही बाब गांभिर्याने न घेतल्यास त्या त्या मोबाईल टॉवरखालीच ठिय्या ठोकण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. खाडीपट्टा विभागात मुस्लिम वस्ती सर्वाधिक आहे. मुस्लिम समाजातील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. खाडीपट्ट्यातील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा कालबाह्यच झाली आहे. बहुतांश ग्राहकांनी बीएसएनएल कंपनीसह खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा खरेदी केली असल्याने सेवा कोलमडत आहे. खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्राहक अक्षरशः मेटाकुटीसच आले आहेत. वापरातील मोबाईल केवळ नावापुरतेच उरले आहेत. १० ते १५ दिवस सेवाच गायब होत असल्याने संवादाच्या देवाणघेवाणीत निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे ग्राहकांना मनस्तापच सहन करावा लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 08/Jan/2025