लांजा : पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था, हे भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची अंतर्गत अत्यंत महत्वाचा विषय आहे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते. त्यामुळे महिला असो किंवा पुरुष प्रत्येक नागरिकांनी सामाजिक जीवनामध्ये सलोख्याचचे वर्तन ठेवल्यास आणि प्रत्येकाने जबाबदारीने वागले तर नवा आदर्श समाज घडेल, असे प्रतिपादन लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी लांजा उर्दू हायस्कूल येथे केले.
महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिग डे (स्थापना दिवस) अनुषंगाने लांजा पोलीस ठाण्यात मार्फत रेझिंग डे दिनाचे औचित्य साधून पोलीस व समाजामधील जवळीकता व आत्मीयता वाढविणे या करिता लांजा शहरातील उर्दू हायस्कूल येथे कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सरंगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल मराठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भुजबळराव, पोलीस शिपाई बजागे आदि उपस्थित होते. यावेळी बगळे पुढे बोलताना म्हणाले की, ऑनलाईन आणि सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. सर्व सावधगिरी बाळगूनही जर तुम्ही सायबर गुन्ह्याला बळी पडलात, तर तुम्हाला निवारणाच्या सर्व पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. पुढील नुकसानापासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. सायबर क्राईम पोर्टल आणि तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी असे आवाहन करून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व शिक्षकांना पोलीस विभाग कामकाज व सामाजिक तत्परता याबाबत माहिती देण्यात आली. सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजाच्या विद्यार्थ्यांनी पोलीस दलाच्या कर्तव्यदक्षता आधारित पथनाट्य सादर केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 09/Jan/2025












