विशाळगड १७५ दिवसानंतर पर्यटक, भाविकांसाठी खुला

कोल्हापूर : विशाळगड १७५ दिवसानंतर पर्यटक, भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच गडावर प्रवेश दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त स्थानिक रहिवासी वगळता अन्य कोणालाही उर्वरित कालावधीत गडावर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. रविवारी (दि. ५) शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी बंदी आदेश लागू केला आहे. दि. ३१ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी शिवभक्तांनी १४ जुलै रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागून विशाळगडासह गजापूरजवळ येथे दंगल उसळली. या दंगलीनंतर जिल्हा प्रशासनाने दि. १५ जुलैपासून संचारबंदी लागू केली होती. महिन्याभराने संचारबंदी हटवून प्रशासनाने बंदी आदेश लागू केला. त्याद्वारे विशाळगडावर स्थानिक रहिवासी वगळता भाविक, पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती.

भाविक, पर्यटकांना घातलेल्या बंदीमुळे विशाळगडावरील वर्दळ पूर्णपणे बंद झाली होती. यामुळे दैनंदिन व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. विशाळगडावर पर्यटक, भाविकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी होत होती. त्याला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने दि. ३१ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भाविक, पर्यटकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाहूवाडी तहसीलदारांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे काढलेल्या या बंदी आदेशात भाविक, पर्यटकांना प्रवेशाची मुभा दिली आहे.

या आदेशानुसार विशाळगड येथील दर्गा इतर देवदेवतांच्या दर्शनासाठी येणारे भक्त, पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच दर्शन, पर्यटनासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाविक, पर्यटकांना सायंकाळी पाचनंतर गडावर थांबता येणार नाही अथवा मुक्कामही करता येणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 09/Jan/2025