रत्नागिरी : राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेला सुवर्णदुर्ग किल्ला (ता. दापोली) वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) या जलदुर्गाची पाहणी केली होती. त्यानुसार लागणाऱ्या सोयीसुविधा, बेकायदेशीर बांधकामे हटवणे, पाणी, टॉयलेट, पार्किंग आदींच्या अॅक्शन प्लॅनच्यादृष्टीने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या सुविधा पूर्ण झाल्यास सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
जिल्हाधिकारी सिंह, बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी हर्णे किल्ला आणि परिसरामध्ये काय सुविधा देता येतील, याची पाहणी केली. दापोली शहरापासून हर्णे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक उपलब्ध आहे. हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईड दर्जा देण्याच्यादृष्टीने युनेस्को संस्थेने नुकतीच या किल्ल्याची पाहणी करून काही सुधारणा आणि सुविधा सुचवल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्याचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्यादृष्टीने हर्णे आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. युनेस्कोला दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार आहे.
आदिलशाहीकडून किल्ला जिंकला
या जलदुर्गाचे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतल्याचा इतिहास आहे. इ. स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार होन खर्च केले, असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे.
असे जा सुवर्णदुर्ग किल्ल्यावर
मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बसस्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते. बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी २० मिनिटे लागतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 09/Jan/2025












