पुण्यात खून झालेली ‘ती’ तरुणी चिपळूणची

चिपळूण : चिपळूणमधील तरुणीबरोबर प्रेमप्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुभदा शंकर कोदारे (28, मूळ चिपळूण, स्थायिक कराड, नोकरीनिमित्त पुणे, बालाजी नगर, कात्रज) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे तर कृष्णा सत्यनारायण कनोजा (28, रा. खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ यूपी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचेे चिपळुणात पडसाद उमटले आहेत.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा मूळची चिपळूण येथील असून तिचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने कराड येथे स्थायिक आहेत. ती नोकरीमुळे पाच वर्षांपासून पुण्यात राहत होती. पुणे विमाननगर येथील डब्लूएनएस कंपनीत काम करत असताना, कृष्णा आणि शुभदा या दोघांची ओळख झाली. कृष्णा हा लिपिक पदावर, तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पुढे दोघांचा चांगली ओळख निर्माण झाली. त्यातून प्रेम संबंध जुळले.

शुभदाने आपले वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या उपचारांसाठी कृष्णा याच्याकडून वेळोवेळी 4 लाख रुपये घेतले. तिच्या सततच्या पैशांच्या मागणीमुळे कृष्णाला तिचा संशय आला. अडीच महिन्यांपूर्वी त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली अन्यत्र वापरल्याचे समजले. तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जिव्हारी लागले. आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याला समजून चुकले होते. त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकविण्याचे मनाशी ठरवले. मंगळवारी येरवडा येथील डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी 6 वाजता कृष्णा याने तिच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. हे वार इतके जोरदार होते की त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि कार्डियाक अ‍ॅटॅक येऊन त्यातच तिचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 10/Jan/2025