देवरुख : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालय ते सद्गुरू लोकमान्य वाचनालय, देवरुख असा ग्रंथदिंडी कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक व वाचक यांच्या सक्रीय सहभागामुळे आनंददायी वातावरणात झाला. या उपक्रमातून वाचन संस्कृती संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
महाराष्ट्रातील संत साहित्याच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान, भगवद्गीता, श्रीरामचरित मानस आणि ज्ञानेश्वरी ग्रंथांचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते.
महाविद्यालयातून प्रारंभ झालेल्या ग्रंथदिंडीचे सद्गुरू लोकमान्य वाचनालयात प्रवेश झाल्यावर विधिवत पूजन ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर, अमृता इंदुलकर, अर्चना राणे, प्रा. धनंजय दळवी आणि नरेंद्र खेडेकर यांनी करून, काही मौल्यवान ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट स्वरूपात दिले. यावेळी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असणारी ग्रंथ संपदा, ग्रंथालयाचे आधुनिकीकरण व वाचकांसाठीची उपयुक्तता याबाबतचा सविस्तर आढावा घेतला.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या स्वराज्य मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. डॉ. वर्षा फाटक, प्रा. स्नेहलता पुजारी, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. अजित जाधव, प्रा. सुनील सोनावणे, प्रा. धनंजय दळवी, तसेच ग्रंथालय सहायक स्वप्नील कांगणे व रोशन गोरुले यांनी विशेष पुढाकार घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 10/Jan/2025














