रत्नागिरी : उद्धव सेना येत्या १५ दिवसांत जिल्ह्यात निम्मी खाली होईल – ना. उदय सामंत

रत्नागिरी : सामंतांचा अस्त करणार म्हणणाऱ्यांची उद्धव सेना येत्या १५ दिवसांत जिल्ह्यात निम्मी खाली होईल. राज्यातील सर्वांत मेगा पक्षप्रवेश रत्नागिरी जिल्ह्यात होणार आहे. आमदार भैया सामंत यांच्या वाढदिवसादिवशी झाला तो फक्त ट्रेलर होता. आता पिक्चर अभी बाकी है। विधानसभा निवडणुकीनंतर अनेक वाईट अनुभव आले. कोणी माझे काम केले? कोणी नाही, याची जंत्री माझ्याकडे आहे. त्यामुळे माझी भूमिका आता बदलली आहे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना जवळ करणार नाही, अशी भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात कार्यकारिणी आणि सदस्य नोंदणीबाबतच्या बैठकीत सामंत म्हणाले, विधानसभा निवडणुकीला प्रमाणिक काम झाले असते, तर माझे मताधिक्य १ लाखांच्या वर गेले असते. पक्षाने शिवदूत नेमले; परंतु ते कुठे गेले? ते समजलेच नाही. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या होत्या; परंतु त्या कागदवरच राहिल्या. आता एक कुटुंब म्हणून आपण काम करावे लागणार आहे. ज्यांना पद मिळाले आहे त्यांना काही झाले, तरी काम करावे लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत होतील, वर्षात नाही. त्यामुळे जिल्हा परिषद गट, गण, प्रभाग, वॉर्डनिहाय बैठकांनी सुरुवात करा. यापुढे कोण जवळचा आणि कोण लांबचा, हे चालणार नाही. जनाधार असलेल्यालाच उमेदवारी मिळणार. पक्षात अनेकांचा प्रवेश होईल. पक्षवाढीसाठी ते मला करावेच लागणार आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. कोणी कुरबुरी करून नये, असा स्पष्ट इशारा उदय सामंत यांनी दिला.

यावेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदककर, आबा पाटील, राजन शेट्ये, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात फिरावे लागणार आहे
आता हातात हात घालून पक्षवाढीसाठी काम करण्याची वेळ आली आहे. आपण विकासकामांच्या माध्यमातून ज्यांना लाभ देतो, त्याची कोणतीही जंत्री आपल्याकडे नाही. आपण काय केले आहे यावर सर्व लक्षात येते. आता शिवसेना पक्षाच्या संघटनेची राज्याची मोठी जबाबदारी माझ्यावर येणार आहे. त्यासाठी मला राज्यात फिरावे लागणार आहे. राज्यात फिरत असताना स्थानिक पातळीवर पक्ष मजबुतीकडे सर्वांनी लक्ष ठेवावे, असे ना. सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 10/Jan/2025