लांजा : आवड असलेल्या क्षेत्रात थोडे अपयश आले की, आवडते क्षेत्रही सोडून देत अपयशाला कवटाळून त्याचे दुःख घेऊन बसणारे आज अनेक विद्यार्थी पहायला मिळतात. ते पर्यायी क्षेत्राचा मार्ग शोधतात आणि एकप्रकारे आपल्या ध्येयाशी तडजोड करतात. मात्र, सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये नावलौकिकता मिळवायची असेल, टिकून रहायचे असेल तर कोणताही न्यूनगंड न बाळगता ज्या क्षेत्राची आवड आहे, त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मेहनत आणि जिद्द कायम राखल्यास यश मिळेल, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते महेश कोकाटे यांनी केले.
ते लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्यावतीने शनिवारी जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार किरण सामंत, वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष मारुती डोळस, रोहिणी डोळस, कार्याध्यक्ष सुभाष राणे, सचिव संतोष पडवणकर, सिने नाट्य अभिनेते अमोल रेडीज, मनीष कोकाटे, संचालक शैलेश डोळस, रवींद्र डोळस, सुरेश चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक अरुण डोळे आदी मान्यवर उपस्थित होते. महेश कोकाटे म्हणाले, माझे मूळ गाव कोकणातील वेरवली असून मी पण ग्रामीण भागातून मुंबईत गेलो. अभिनय क्षेत्रात जिद्दीने प्रयत्न, अनेक वर्षे झगडत राहिलो आणि त्यामुळेच अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली. याप्रसंगी आमदार किरण सामंत म्हणाले, वेरवली शिक्षण संसंस्थेचे काम आदर्शवत सुरू आहे. वेरवली शिक्षण संस्थेच्या प्रत्येक उपक्रमासाठी शालेय सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक विभाग उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास दिला.
अभिनेते महेश कोकाटे यांना स्व. रमेश धोंडू डोळस कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सुभाष लाड, साक्षी पडवणकर, आबा सुर्वे, प्रविण कांबळे, विजय हटकर, सुभाष बोडस, शिवाप्पा उकली, तेजस्विनी आचरेकर, भाई जोशी, महिलाश्रम लांजा यांचा गौरव केला गेला. या वेळी जयवंतभाऊ शेट्ये, विजय बेर्डे, विद्या बेलवलकर, संपदा वाघधरे, जयवंत जाधव, सुरज कुडतडकर, पंढरी गुरव यांसह वेरवली पंचक्रोशीमधील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल रेडीज यांनी, सूत्रसंचलन विनोद बंडगर, सचिन कांबळे तर मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 10/Jan/2025













