चिपळूण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले करिअर घडविण्यासाठी ठाकरे गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटातील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काहींनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क केला आहे, तर काहींनी तालुक्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मध्यस्ती केली आहे. या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाची सोमवारी (ता. १३) चिपळूणमध्ये बैठक होणार आहे.
त्यात कार्यकर्त्यांना कानमंत्र मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील पाचपैकी गुहागरची एकच जागा महाविकास आघाडीला राखता आली.
पुढील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर होतील, त्यासाठी तालुक्यात सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मध्यविकास आघाडी विशेष म्हणजे उद्धव ठाकरे सेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर राजकीय ‘करिअर’चा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. त्यांची अवस्था इकडे “आड” आणि तिकडे विहीर” अशी आहे. त्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. सत्ताधारी गटात गेल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल आणि सत्तेच्या माध्यमातून कामे होतील. या आशेने काही कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी किंवा पक्षाचे संघटनात्मक पद अशा दोन अटी कार्यकर्ते शिंदे गटासमोर ठेवत आहेत.
चिपळूण विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपला ताकद वाढवायची आहे. येथे शिवसेना मजबूत आहे, परंतु ती दोन गटात विभागली गेली आहे, त्यामुळे ‘राजकीय करिअर साठी अनेकजण शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. ‘विनाअट’ सुखाने नांदण्यासाठी जे येतील अशाच इच्छुकांना भाजप पक्षामध्ये सामावून घेईल, असे सध्याचे चित्र आहे.
चिपळूण तालुक्यात ठाकरे गट मजबूत आहे. आगामी निवडणुकीत लढण्यासाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते पक्ष सोडणार नाही. ज्यांना पक्ष सोडायचे होते, त्यांनी या आधीच पक्ष सोडला असता. आता पक्षात आहेत ते सर्व कट्टर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. – शशिकांत मोदी, शहरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
आज चिपळुणात बैठक
कार्यकत्यांनी पक्ष सोडू नये यासाठी ठाकरे गटाचे नेते कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. महिन्यातून एकदा कार्यकर्त्यांची बैठक घेतली जात आहे. मुंबईतील पदाधिकारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी (ता. २३) ठाकरे गटाची बैठक चिपळूण येथील माधव सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सजंय कदम, सहसंपर्क प्रमुख सचिन कदम मार्गदर्शन करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:43 PM 13/Jan/2025














