रत्नागिरी : सलग तिसऱ्या दिवशी पकडली घुसखोर नौका

रत्नागिरी : सीमा शुल्क विभागाने सलग तिसऱ्या दिवशी दहा वाव समुद्रात गस्त घालत असताना काल सकाळी एलईडी लाईट पुरविणारी सोलिहा ही नौका पकडली. ‘कस्टम’च्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या आणि पर्ससीन मच्छीमारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

मागील तीन दिवसांपासून कस्टम विभागाने १० वाव समुद्रात मासेमारीसाठी एलईडी लाईट पुरविणाऱ्या नौकांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. सलग दोन दिवस लाखो रुपयांच्या साहित्यासह दोन नौका पकडल्यानंतर काल तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कस्टमचे निरीक्षक अभिषेक शुक्ल व सहकारी गस्त घालत होते. यावेळी मिरकरवाड्यापासून दहा वाव समुद्रात मोठ्या प्रमाणात एलईडी लाईट पुरवणारी नौका दिसून आली. ही नौका पालघर डहाणू येथील असून, रत्नागिरी राजीवडा येथील इब्राहिम सुवर्णदुर्गकर या व्यक्तीने चालवण्यासाठी घेतली असल्याचे आढळून आले. ही नौका स्वतः मासेमारी न करता अन्य नौकांना मासेमारीसाठी एलईडी लाईट भाड्याने देते. या नौकेवरही मोठा जनरेटर शेकडो लिटर डिझेल व मोठ्या संख्येने एलईडी बल्ब आढळून आले. या बोटीवर चार खलाशी होते. ही नौका ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

नौकेवर जनरेटर, इंधनसाठा
ताब्यात घेतलेली नौका स्वतः मासेमारी न करता अन्य नौकांना मासेमारीसाठी एलईडी लाईट भाड्याने देते. या नौकेवरही मोठा जनरेटर शेकडो लिटर डिझेल व मोठ्या संख्येने एलईडी बल्ब आढळून आल्याचे कस्टम विभागाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 14/Jan/2025