व्यवसाय न देणारी भाषा समाज सोडून देतो : अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आजपासून सुरू करण्याचे घोषित केले आहे. मराठीला राजाश्रय नाही, अभ्यासातून हद्दपार, रोजच्या व्यवहारात नाही. जी भाषा बोलणाऱ्या समाजाला व्यवसाय देऊ शकत नाही तो समाज ती भाषा सोडून देतो. हा इतिहास आपण विसरता कामा नये. रत्नागिरी जिल्ह्यात फौजदारी खटल्यात ६७ टक्के, तर दिवाणीकामात ६४ टक्के निकाल मराठीत झाले ही समाधानाची बाब आहे, असे मत अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ते म्हणाले, मराठी राजभाषा अधिनियम १९६४ अन्वये प्रशासकीय कारभार मराठीतून करणे अनिवार्य आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधक यानी कनिष्ठ स्तरावरील न्यायालयांना मराठीतून कामकाज करण्यासंबंधी गेल्या वर्षी काढलेले परिपत्रक चक्क इंग्रजीत आहे. यातून मराठीचे संवर्धन कसे होणार? पुण्याच्या पुस्तक महोत्सवात ४० कोटी पुस्तकांची उलाढाल झाली, ही समाधानाची बाब. सातवाहन आणि मराठे असे मराठी राज्यकर्ते भारतभर राज्य करत होते. मराठीला अभिजात दर्जा मिळाला, याचे समाधान आहे.

मराठी अधिकाधिक सशक्त होऊन ज्ञानभाषा झाली, तरच ती इंग्रजीशी टक्कर घेऊ शकेल, मराठीच्या शब्दकोशात एक लाख शब्द आहेत. इंग्रजीत आठ लाखांच्या आसपास शब्द आहेत. बोलीभाषेचे शब्द मराठीने सामावून घेतले पाहिजेत, भाषा जेव्हा प्रवाही बनते तेव्हाच ती सक्षमतेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू करते.

भाषा भवन लवकर होवो
मराठी विषय सक्तीपेक्षा अस्मितेचा केला पाहिजे. मराठी ही लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून टिकावी, यासाठी राज्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत. केवळ मराठी सक्तीच्या आणि पाठ्या बदलण्याच्या कार्यक्रमातून राजकारण होईल; परंतु परिस्थिती सुधारणार नाही. मराठी भाषा भवनाच्या जागेचा प्रस्ताव बांद्रा/कुर्ला, कामा रुग्णालयानजीक, ऐरोली व आता मरिन ड्राईव्ह अशी भटकंती सुरू आहे. मराठी भवन लवकर पूर्ण होवो, अशी सदिच्छा पाटणे यांनी व्यक्त केली.

Amey jwelrs

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 14/Jan/2025