लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी: अर्जांची सरसकट पडताळणी नाहीच

चिपळूण : महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अर्जांच्या पडताळणीबाबत महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेतील दोन कोटी ५९ लाख महिला पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे, आणि जानेवारी महिन्याचा लाभ २० तारखेनंतर मिळणार आहे. या योजनेच्या अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही, तर ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल, त्याच मुद्द्यांवर तेथील अर्जांची पडताळणी होईल.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. या योजनेची सुरुवात झाल्यानंतर तीन महिन्यांतच दोन कोटी ४० लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केले होते. अर्जांच्या पडताळणीसाठी तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या, ज्यांनी कागदपत्रे पाहून अर्जाला मंजुरी दिली आणि जिल्हास्तरीय समित्यांकडे अर्ज पाठविले.

या योजनेत अर्जदार महिलांना शासकीय कार्यालयांमध्ये विविध कागदपत्रे तथा दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून कागदपत्रांची अट देखील शिथिल करण्यात आली होती. प्रत्येक लाडक्या बहिणींचे स्वयंघोषणापत्र घेतले गेले होते. मात्र, आता त्या अर्जदार लाडक्या बहिणींमध्ये ५० लाखांहून अधिक अर्ज अपात्र असल्याचे बोलले जात आहे.

राज्यस्तरावरुन कोणतेही स्वतंत्र आदेश दिले जाणार नाहीत, तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा असल्याचे आयुक्त कैलास पगारे यांनी सांगितले. तक्रारी आल्यावरच होईल पडताळणी, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 16/Jan/2025