संगमेश्वर : तालुक्यात येणाऱ्या कोंड असुर्डे रेल्वे ट्रॅकवर भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याला येथून जाणाऱ्या मालगाडीची जोरदार धडक बसल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवारी) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून संगमेश्वर शहरात तसेच आजूबाजूच्या गावांत बिबट्याने हैदोस घातला असून काहींना प्रत्यक्षात त्याचे दर्शन झाले. तसेच भक्ष्य शोधार्थ भटकंती करताना मानवी वस्ततीत घुसण्यापर्यंत त्याने मजल मारली होती त्याचे दृश्य सी.सी. कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले आहे. या सर्व प्रकारांमुळे सर्वत्र बिबट्याची दहशत होती. असे असतानाच कोंड असुर्डे रेल्वे ट्रॅक वर बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याचे घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी मार्गे येणाऱ्या व मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी समोर कोंड असुर्डे ट्रॅक नंबर 173/4 ते 173/5 या दरम्यान बिबट्याला मालगाडी ची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.. या घटनेची माहिती मालगाडी चालकाने जवळच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनला दिली. त्यानुसार रेल्वे ट्रॅक लाईनमेन उपेंद्र रहाटे यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यावर संगमेश्वर पोलिस ठाणे तसेच वनविभागाला रेल्वे ट्रॅक वर बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन च्या सबंधिताकडून देण्यात आली. संगमेश्वर तालुका वनपाल तौफिक मुल्ला हे वनरक्षक सुरेश तेली, वनरक्षक अरुण माळी यांना बरोबर घटनास्थळी दाखल झाले. व पंचनामा करून रेल्वे ट्रॅकवर शरीरापासून दोन भाग झालेल्या बिबट्याचा देह एकत्र करून मोकळ्या जागेत आणले.
बिबट्या मृतावस्थेत मिळाल्याची बातमी मात्र सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि ते पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळली एवढेच नव्हे तर डिंगणी आंबेड मुख्य रस्त्या शेजारीच बिबट्याचे शव ठेवण्यात आल्याने या मार्गावरून येणारे वाहने थांबून मृत बिबट्याचे एक प्रकारे दर्शन घेऊनच पुढे जात होते.
मृत बिबट्या हे मादी जातीचे तसेच सुमारे दोन वर्षाचे असल्याचा अंदाज वनविभागाकडून काढण्यात आला असून वनरक्षक अरुण माळी, वन रक्षक सुरेश तेली यांनी रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत मृत बिबट्याला अग्नी दिली. यावेळी पोलीस पाटील सुभाष गुरव उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 17/Jan/2025














