दापोली : वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने कारवाई

दापोली : दापोलीत बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीस अडथळा केल्याने दापोली पोलिसांनी वाहतूक नियमानुसार कारवाई केली. दापोली बसस्थानक शेजारी सर्कलवर सफेद रंगाची कार बेशिस्त पार्किंग करून ठेवली होती. त्यामुळे एसटी बस आणि अन्य वाहने यांना अडथळा निर्माण होत होता. याबाबत नागरिकांनी दापोली पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी ई-प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई केली. दापोली शहरात बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीस अडथळा हे नित्याचेच झाले आहे. दापोली बाजारपेठ आणि मासळी मार्केट या ठिकाणी रोजचीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकवेळा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

दापोली ते बुरोंडी नाका हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने याठिकाणी देखील अनेकवेळा वाहतुकीचे अडथळे निर्माण होतात. बसस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या भागात सायंकाळी ट्रॅव्हल्स गाड्या पार्किंग केल्या जातात. दोन्ही बाजूने वाहने उभी केल्याने अनेकवेळा नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा ट्रॅव्हल्स चालक हमरीतुमरीवर येतात, असे प्रसंग अनेकवेळा घडले आहेत. मध्यंतरी या ट्रॅव्हल्स आझाद मैदानातून सुटत होत्या. मात्र, आता पुन्हा शासकीय रुग्णालय समोरील रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे दापोली पोलिसांनी याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 20/Jan/2025