Ratnagiri: बांगलादेशी महिलेचे सावर्डेतील तरुणाशी लग्न

रत्नागिरी : घुसखोरी करणार्‍या बांगला देशी नागरिकांचे भारतातील कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. शहरातील साळवी स्टॉप येथील भर वस्तीमध्येही बांगला देशी महिला सापडली आहे. तिचे बांगला देशीतील नाव सलमा मुल्ला असून ती रत्नागिरीत सलमा राहिल भोंबल या नावाने वावरत होती. ही महिला गेली पाच वर्षे व्हिसाची मुदत संपूनही येथे वास्तव्य करून होती. तिने आधार कार्ड, पॅनकार्ड आदी भारतातील रहिवासी असल्याचे पुरावे तयार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि शहर पोलिसांनी ही कारवाई केली मुंबई येथे वास्तव्याला असताना सावर्डे ( चिपळूण) येथील राहिल भोंबल याच्याशी तिची ओळख झाल्यानंतर ती त्यांच्या सोबत लग्न करून रत्नागिरीत राहायला आली होती. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील नाखरे येथे चिरेखाणीवर काम करणार्‍या 13 बांगलादेशीयांना काही दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते. त्यानंतर पोलिसदल व सुरक्षा यंत्रणा एकत्रित काम करून तालुक्यात व जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ राबवण्यात आले. ही प्रक्रिया सुरू असतानाच शिरगाव ग्रामपंचायतीकडून एका बांगलादेशीय व्यक्तीला जन्मदाखला दिल्याचे उघड झाले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशातील अनेकांचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे. शिरगावप्रकरणी ग्रामसेवकासह तत्कालीन सरपंच व सदस्यांची मुंबई एटीएसकडून चौकशी केली गेली.

ही दोन प्रकरणे ताजी असतानाच एटीएस आणि शहर पोलिस यांच्या संयुक्त पथकाने साळवी स्टॉप येथे राहणार्‍या एका बांगला देशी महिलेला पकडले आहे. ही महिला गेली दहा वर्षे भारतात वास्तव करून असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या महिलेने आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड आदी भारत देशाचे पुरावे तयार केले आहेत. या महिलेला ताब्यात घेऊन सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर केले. एटीएसचे पोलिस उपनिरीक्षक विनय नरवणे, पोलिस अंमलदार स्वप्नील तळेकर तसेच शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार शरद जाधव, कौस्तुभ जाधव, महिला पोलिस अपर्णा सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ही बांगला देशीय महिला 16 डिसेंबर 2016 मध्ये भारतात मुंबईत आली होती. त्यावेळी प्रवास केल्याचे पासपोर्टवर बांगलादेश व भारत देशाचे इमीग्रेशनचे शिक्केही आहेत. तिच्याकडे भारतात राहण्याच्या 90 दिवसांचा व्हिसा होता. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही ती गेली 10 वर्ष भारतात वास्तव्यास होती. याठिकाणी तिने सावर्डेतील तरुणाशी लग्नही केल्याचे दिसून आले. पुढील तपासाच्या दृष्टीने या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 20-01-2025