प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कोकण रेल्वे मार्गावर लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होणार!

खेड : कोकण रेल्वे मार्गावर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रत्नागिरीत लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होणार आहे.

या पोलीस ठाण्यात १४० पोलिसांचा ताफा दिमतीला असणार आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे. कोकण रेल्वेगाड्यांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. याशिवाय

चोऱ्या सह विनयभंगाच्या तक्रारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तातडीने नोंदवणे शक्य होणार असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेत नवी भर पडणार आहे.

रोहा रेल्वेस्थानकापासून कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. या हद्दीतील प्रवाशांच्या सुरक्षेसह गुन्हयांचा तपासाची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. कोकण मार्गावर रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे दागिने लंपास करण्यासह त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. रेल्वे डब्यातील आरक्षित आसनांवर प्रवासी गाढ झोपल्याची संधी साधत चोरट्यांकडून मोबाईलही हातोहात लांबवले जात आहेत.

या साऱ्या गुन्हयांची तक्रार बऱ्याचवेळा मुंबईत आल्यानंतरच संबंधित प्रवाशांना करावी लागते. रेल्वे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलीस करतात. तक्रारी देण्यास होणाऱ्या विलंबामुळे गुन्ह्यांचा छडाच लागत नाही, कोकण मार्गावरील हद्दीतून प्रवाशांचा प्रवास सुरू झाल्यानंतर महिलांचे विनयभंग, छेडछाड व हाणामारीच्या तक्रारीही लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर येतात. मात्र, कोकण मार्गावरील हद्दीत लोहमार्ग पोलिसांअभावी रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधत यथोचित कारवाई करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागत होते.

कोकण मार्गावरील रेल्वेस्थानकांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता अबाधित ठेवत वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी कोकण मार्गावर रोहा, कणकवली, रत्नागिरी या तीन स्थानकांवर लोहमार्ग पोलीस स्थानकांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य ‘सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार कोकण मार्गावर येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी शासनाकडून ९१ लाख ७० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोहमार्ग पोलीस ठाणे उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे.

कोकण मार्गावर वाढत्या गुन्हेगारीसह चोऱ्या रोखण्यास मदत होणार आहे. दरोडे, विनयभंग यासह कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यास तातडीने कार्यवाही करण्याची प्रक्रियाही जलद गतीने होणार असल्याने गुन्ह्यांचा उलगडा तातडीने होण्यास मदत होणार आहे.

रत्नागिरी रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कोकण मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी’ कार्यान्वित होणार आहे. या लोहमार्ग पोलीस ठाण्यात १४० पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:42 20-01-2025