साडवली : देवरूख आगारातील बसेस नादुरुस्त झाल्या असून, ३० बस देण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. संगमेश्वर तालुक्याचा वाहतुकीचा मुख्य आधार असलेल्या देवरूख आगाराच्या दयनीय परिस्थितीमुळे प्रवाशांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
आमदार शेखर निकम यांनी एक वर्षांपूर्वीच लेखी मागणी करून देवरूख आगाराला प्राधान्याने ३० बस देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. एसटी प्रशासनाने नवीन बस खरेदीत देवरूखला प्राधान्य दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते; मात्र २ हजार ६४० नवीन बस खरेदी करूनही देवरूखला एकही बस मिळाली नाही.
सध्या देवरूख आगार सुरळीत चालवण्यासाठी ९६ बसेसची आवश्यकता असते. सध्या केवळ ६० बसेस आहेत. त्या ६० बसेसवर कारभार चालवताना स्थानिक प्रशासनाला तारेवरची करसत करावी लागत आहे. या ६० मधील काही बसवर नादुरुस्त आहेत किंवा वर्कशॉपमध्ये आहेत.
आरटीओ पासिंगसाठी रत्नागिरीला गेलेल्या बसेस अद्याप परतलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कर्मचाऱ्यांवर अनावश्यक ताण वाढला आहे आणि जनतेचे संतापजनक अनुभव प्रशासनाकडे पोहोचत आहेत.
प्रवाशांचा भर मोठ्या प्रमाणात एसटीवर
गेल्या दोन वर्षात एसटीकडून चारवेळा बसेस वितरित करण्यात आल्या; पण देवरूख आगाराला एकदाही बस मिळाल्या नाहीत. गेल्या दोन वर्षात महामंडळाने विविध प्रकारच्या बसेस खरेदी केल्या. इलेक्ट्रिक आणि हिरकणी बसेस खरेदी करण्यात आल्या; मात्र यातील देवरूख आगाराला एकही बस मिळाली नाही. संगमेश्वर हा कोकणातील मोठा तालुका असून, येथे प्रवाशांचा भर मोठ्या प्रमाणावर एसटीवर आहे. संगमेश्वर, साखरपा, माखजन यांसारख्या मोठ्या ठिकाणी देवरूख आगाराने व्यवस्थित सेवा देणे आवश्यक आहे; पण गाड्यांची कमतरता, कर्मचारी कमतरता, यांत्रिक कर्मचारी कमतरता आणि साहित्य कमतरता यामुळे कारभार करताना स्थानिक प्रशासनच हतबल झालेले दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 22/Jan/2025














