रत्नागिरी : सणासुदीच्या दिवशी सवलतींचा वर्षाव आणि कमीत कमी डाऊन पेमेंटवर दुचाकी वाहने मिळू लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यात प्रतीदिन ४८ ते ५० नवीन दुचाकी रस्त्यावर येत आहेत. नुकत्याच संपलेल्या वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये तब्बल १७ हजार ८०७ नवीन दुचाकींची प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंद झाली आहे.
दुचाकी वाहनांच्या विक्रीसाठी कंपन्या आणि शोरुमकडून ग्राहकाला अनेक सवलती दिल्या जातात. कमीत कमी डाऊनपेमेंट किंवा आगाऊ रकमेवर महागड्या नवीन दुचाकी दिल्या जाऊ लागल्या आहेत. पूर्वी एकरकमी किंवा बँकेच्या कर्जावर दुचाकी मिळत होत्या. परंतू कर्ज मिळवणे आणि एकरकमी किंमत देवून दुचाकी खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य नव्हते. आता मात्र ही परिस्थिती बदलली असल्याने रोजच्या रोज नवीन दुचाकी शोरुम मधून बाहेर पडत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या मार्च अखेर नवीन १७ हजार ८०७ नवीन दुचाकी येऊन आता ३ लाख ३० हजार ७७७ दुचाकी झाल्या आहेत. त्यामुळे सन २०२३-२४ मध्ये प्रतीदिन ४८ ते ५० नवीन दुचाकी विकल्या गेल्या आहेत. नवीन दुचाकी खरेदीमध्ये आजही पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींना अधिक पसंती आहे. यातील १६ हजार ४८० पेट्रोलवर धावणाऱ्या दुचाकी असून, केवळ १ हजार ३२७ दुचाकी विजेवर चालणाऱ्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये ३ लाख १२ हजार ९७० दुचाकी होत्या. यातील ३ लाख ११ हजार ९८७ पेट्रोलवर चालणाऱ्या तर ९८३ विजेवर चालणाऱ्या दुचाकी होत्या. त्यामुळे सन २०२३-२४ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीमध्येही ३४४ ने वाढ झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:47 PM 22/Jan/2025












