रत्नागिरी : शहरातील तांबट आळी येथील नवलाई मंदिरा समोर रस्त्यात आढळलेला ६० हजार रुपयांचा आयफोन मोबाईल चार शालेय विद्यार्थ्यांनी शहर पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर शहर पोलिसांनी मोबाईल मालकाचा शोध घेऊन त्याचा मोबाईल त्याच्या ताब्यात देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
श्रेयस कैलास मोरे (इयत्ता ८ वी), यश दीपक रामगडे (इयत्ता ९ वी), ध्रुव धनंजय बसणकर (इयत्ता ९ वी) आणि अमेय राजू रामगडे (इयत्ता ९ वी) अशी या विद्यार्थ्यांची नावे असून हे सर्व विद्यार्थी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेचे विद्यार्थी आहेत. सोमवार दि. २० जानेवारी रोजी नितीन रमेश डोळस हे तांबट आळी येथून जात असताना त्यांचा मोबाईल रस्त्यात पडला होता. दरम्यान, त्याच परिसरातील कॉन्व्हेंट हायस्कूलचे हे चार विद्यार्थी तांबट आळी येथून जात असताना त्यांना रस्त्यात हा फोन पडलेला दिसून आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाजुच्याच शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तेथील ठाणे अंमलदारांना सर्व हकिकत सांगितली.
शहर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून मोबाईल मालकाचा शोध घेऊन त्याला शहर पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी त्या चारही शालेय विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करत त्या मुलांच्या हस्तेच मोबाईल मुळ मालकाच्या स्वाधीन केला. मुलांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 22/Jan/2025














