दापोली : केळशीत वनविभागाने पकडली ९६ माकडे

दापोली : तालुक्यातील केळशी येथे वनविभागाने चांगली कामगिरी बजावली आहे. ९६ माकडांना पकडून जंगलात सोडले. वनविभागाच्या मोहिमेला यश आलं असून पुन्हा एकदा अशीच मोहीम राबवली जाणार आहे, असे दापोली वनविभागाचे वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील केळशी परिसरात माकडाने केळशी रहिवाशी व्यापारीवर्ग, भाजीविक्रेते, वडापाव दुकानदार, शेतकरी, बागायतदार यांना त्रस्त करून सोडले होते. केळशी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार, वनविभागाचे वनाधिकारी प्रकाश पाटील, शुभांगी गुरव व त्यांचे सहकारी सूरज जगताप आदींनी दोन दिवस या उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. या वेळी सुमारे ९६ माकडे पिंजऱ्यात पकडण्यात आली. माकडांना केळी, शेंगदाणे, चपाती आदींचे आमिष दाखवून पिंजऱ्याकडे आकर्षित करण्यात आले. माकडे पिंजऱ्यात शिरल्यानंतर लगेचच त्या पिंजऱ्याचा दरवाजा बंद होत होता. उर्वरित माकडेदेखील अशीच पकडून न्यावीत, असे केळशी ग्रामस्थ विनवणी करत आहेत. केळशीचे माजी सरपंच केदार पतंगे, नरेंद्र आग्रे, उटंवर पोलिसपाटील श्रीकांत साबळे, बळीराम उके आदी ग्रामस्थ सहभागी झाल्याने वनाधिकारी वर्गाला मोठी मदत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 23/Jan/2025