लांजा : माझ्या अवघ्या दोन वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मी कोकणातील पाच जिल्ह्यातील सर्व शाळांना ई-लर्निंग साहित्य देण्याचे काम केले आहे. त्याचा लाभ कोकणातील लाखो शिक्षक व विद्यार्थी यांना होणार आहे. या ई-लर्निंग साहित्यातून शिक्षकांनी दर्जेदार अध्यापन करताना आपल्या महापुरुषांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचे साहित्य व विचार देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे, असे सांगत शासन दरबारी शिक्षक व कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी शिक्षक आमदार म्हणून प्रयत्नशील आहे. लवकरच अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ व जुनी पेन्शन यांसह अन्य प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लांजा येथे व्यक्त केला.
कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून मंगळवारी २१ रोजी न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या सभागृहात राजापूर व लांजा तालुक्यातील सुमारे ३१ माध्यमिक शाळांना ई लर्निंग साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. लतेश नांदगावकर, लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, भाजप लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, भाजप जिल्हा नेते विजय कुरूप, लांजा शहर प्रमुख गुरुप्रसाद तेली, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव महेश पाटकर, लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटोळे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव महेश
सत्रे, संचालक प्रसन्न शेटे, सचिन भिंगार्डे, हर्चे हायस्कूलचे अध्यक्ष बवन मयेकर, लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, सचिव सय्यद आदी उपस्थित होते.
ई लर्निंग साहित्याचे वाटप आमदार किरण सामंत व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार किरण सामंत म्हणाले, सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे म्हणूनच अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला तर ते अध्यापन अधिक प्रभावी ठरते. खऱ्या अर्थाने शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढवायची असेल तर आमदार म्हात्रे यांनी आमदार निधीतून दिलेले ई लर्निंग साहित्य शिक्षक व विद्यार्थी यांना उपयोगी ठरेल आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन वेरवली हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी केले. लांजा, राजापूर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 23/Jan/2025













