चिपळुणात उद्या आ. नीलेश राणे यांची गर्जना सभा

चिपळूण : खेर्डीहून कराडकडे गुरांची बेकायदा वाहतूक सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी नुकताच हा प्रकार कुंभार्ली घाटातील चेकपोस्ट येथे उघडकीस आणला. शिरगाव पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली आहे. मात्र, अन्य दोन संशयितांना अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणी शिवसेनेचे आमदार तथा माजी खासदार नीलेश राणे आक्रमक झाले असून, ते चिपळूण येथे दि. २५ रोजी सायं. ५ वा. गर्जना सभा घेणार आहेत. या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कराड येथे कत्तलीसाठी हे गोवंश नेले जात असावेत, असा संशय आहे. भाजपाचे विनोद भुरण व कार्यकत्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे गुरांची बेकायदेशीर वाहतूक खेर्डीतून होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून अन्य दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. गेले अनेक दिवस कुंभार्ली घाटमार्गे गोवंशाची वाहतूक होत होती. भाजपा कार्यकर्त्यांनी पाळत ठेवून हे प्रकरण उघडकीस आणले. एका ट्रकमध्ये तब्बल २२ जनावरे कोंबली होती. या प्रश्नाकडे आ. नीलेश राणे यांनी लक्ष वेधले असून चिपळूणमध्ये येऊन हा प्रकार उघडकीस आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

गोवंश तस्करीमध्ये कोणाकोणाचे हात आहेत, कोण सामील आहेत? हा सर्व प्रकार आपण उघड करणार असल्याचे आ. राणे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे २५ रोजी शहरातील प्रांत कार्यालयासमोरील महामार्गाच्या मैदानात ही गर्जना सभा होणार असून, यावेळी आ. राणे कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 24/Jan/2025