अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची गती वाढवावी : खा. सुनील तटकरे

मंडणगड : केंद्र व राज्य शासनाच्या योजना व दोघांच्याही समन्वयाच्या योजना अधिक गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी व महाराष्ट्राला विकास वाटेवर अधिक गतिमान करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची गती वाढवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. मंडणगड पंचायत समितीच्या सभागृहात २३ जानेवारी २०२५ रोजी आयोजीत आढावा सभेत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी त्यांनी एस.टी., महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती बांधकाम विभाग, बी.एस.एन. एल., पाणी पुरवठा विभाग, नगरपंचायत, वनविभाग आदी खात्यांचा आढावा घेतला व या खात्यांशी संबंधीत नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या, आढावा बैठीकीस निर्णयक्षम अधिकारी वर्ग उपस्थित नसल्याने याबद्दल खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त करताना अधिकारी वर्गान आपल्या संवेदना जागरुक ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली.

सर्व खात्यांना पुढील एक महिन्यांचा कार्यक्रम आखून देताना आपण या संदर्भात स्वताः पाठपुरावा करुन दिलेल्या कामाचे अवलोकन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी तालुक्यातील हर घर जल या जलजीवन योजनेसंदर्भात पाणी पुरवठा विभागाने घोषित केलेल्या गावांमधील योजनेची गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंधरा दिवसात तलाठी, ग्रामसेवक यांनी पाहणी करून १५ दिवसात आवहाल सादर करण्याचे निर्देश यावेळी खासदारांनी दिले व त्यावर आपण स्वतः योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सूतोवाच केले. जिल्हा वाहतूक नियंत्रक, दुरसंचार कंपनी वरिष्ठ अभियंता रत्नागिरी इत्यादी खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरताना मंडणगड तालुक्यास भेट देऊन प्रत्यक्ष जागेवर अहवाल करण्याचे आदेश दिले.

यावेळी दापोलीच्या प्रातांधिकारी अर्चना बोंबे, तहसीलदार अक्षय ढाकणे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, सा. बां. विभागाचे उपअभियंता महेश वास्ते, जिल्हा परिषद बांधकामाचे अभियंता देवकीनंदन सकपाळे, यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर फौजदारी कारवाई करणार
आढावा बैठकीस उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत ही त्यांनी यावेळी दिले. कामचुकारपणा करणारे अधिकारी सूचना, आदेश ऐकत नसतील तर त्यांच्या विरोधात बेट फौजदारी कारवाई करण्याचे संकेत यावेळी खा. सुनील तटकरे यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 24/Jan/2025