रत्नागिरी : प्रादेशिक नळपाणी योजनेच्या ठेकेदाराला नोटीसा

रत्नागिरी : मिऱ्या शिरगावसह ३४ गावांच्या प्रादेशिक नळपाणी योजनेच्या ठेकेदाराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पंधरा दिवसांत तीन नोटिसा बजावल्या आहेत. रिप्लिंग व्यवस्था चांगली नाही, जबाबदारीने काम होत नाही, योजनेच्या कामात गती नाही, अशा प्रकारच्या या तीन नोटीस बजावल्या आहेत तसेच अन्य काही चुका झाल्यामुळे ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्य अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता संजय पाटील यांनी दिली.

रत्नागिरी तालुक्यातील ३४ गावांतील २०४ वाड्यांची तहान भागवणाऱ्या मिऱ्या, शिरगाव, निवळी तिठा यांसह अन्य ३४ गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. पुढील २६ वर्षांतील सुमारे दोन लाख लोकांचा विचार करून ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांची तहान भागणार असून, एमआयडीसीवरील पाणीपुरवठ्याचा भार कमी होणार आहे. १३५.७२ कोटी रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात येणार असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली योजनेचे काम सुरू आहे.

या योजनेतील अनेक त्रुटी आता हळुहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. योजनेच्या टाक्या बांधण्यासाठी जागेचे भूसंपादन केले नसताना टाक्या निश्चित केल्या आहेत. योजनेत एकूण ३४ टाक्या आहेत. त्यापैकी १२ टाक्या पूर्ण झाल्या आहेत. ३ टाक्या ग्रामपंचायतीने रद्द केल्या आहेत. ८ टाक्यांना जागाच नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. नवीन उपअभियंता संजय पाटील यांनी योजनेची पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदारांना पंधरा दिवसांमध्ये तीन नोटिसा बजावल्या आहेत. पाणी योजनेच्या कामात अपेक्षित गती नाही, असा ठपका ठेवून ठेकेदाराला प्राधिकरणाने नोटिसा बजावल्या आहेत.

पुन्हा लाईन काढावी लागणार
निवळी येथे राष्ट्रीय महामार्गादरम्यान लाईन आऊट मिळाले होते. त्यानुसार ८० मीटरची लाईन टाकून झाली आहे. आता तेथूनच सेवा रस्ता होणार आहे. त्यामुळे पुन्हा ही लाईन काढावी लागणार आहे. या सर्व चुकांमुळे ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत मुख्य अभियंत्यांना प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 24/Jan/2025