मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी छेडणार उपोषण

मंडणगड : तालुक्यातील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीकरिता प्रजासत्ताक दिनी आंबडवे येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात २२ रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत या शिक्षकेतर कर्मचारी व आंबडवेतील ग्रामस्थ यांनी माध्यमांना माहिती दिली.

या विषयासंदर्भात शिक्षेकत्तर कर्मचारी, देणगीदार जमीन मालक सुदर्शन सकपाळ, सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, नीलेश सकपाळ, नीलेश जाखल, सुजाता सकपाळ, विनीता सकपाळ, प्रिती तांबे, प्रफ्फुल तांबे, राजेंद्र राऊत यांनी भिंगळोली येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार आंबडवे येथे झालेल्या महाविद्यालयास गावातील ग्रामस्थांनी देणगीरुपाने १३.५०
एकर मोफत जागा उपलब्ध करुन दिली. असे असताना मुंबई विद्यापिठाने ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नाही. विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. देणगीदारांपैकी सात कुटुंबातील व्यक्तींना कामावर घेण्यात आले. अद्याप सहा कुटुंबातील व्यक्तींना रोजगार देण्यात आलेला नाही. कामावर घेतलेल्या सात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी भरतीच्या अटी व शर्थीचे नियमांच्या अधीन राहून भरती करण्यात आलेली नाही. सर्व कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने कामावर घेण्यात आलेले आहे व दरवर्षी त्यांची मान्यता घेतली जाते त्यांना कामावर कायम करण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही तर ठोक पध्दतीने वेतन दिले जाते. विद्यापीठाने दिलेल्या या वागणुकीच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवूनही या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, नियमाप्रमाणे वेतन देणे व मागील फरकाची वजावट देणे या मागण्यांसाठी विद्यापिठाचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी गतवर्षीच्या जानेवारी महिन्यापासून चर्चा सुरु आहे.

या संदर्भात दिलेल्या आश्वासनांच्या पुर्तता न झाल्याने सर्व कर्मचारी प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार आहेत. लिखीत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. आंदोलनांच्या पुढील टप्प्यात मुंबई विद्यापीठाच्या बाहेर घंटानाद आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकर या विचारांना मानणाऱ्या शंभरहून अधिक संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या विषया संदर्भात तहसीलदार मंडणगड यांच्या कार्यालयात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 24/Jan/2025