श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात

सावंतवाडी : सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी (ता. २१) उत्साहात पार पडला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सोनुर्ली -पाक्याचीवाडीयेथे हिराप बंधूंची कुलदेवता असलेल्या श्री देवी भवानी मातेचे मंदिर आहे. समस्त सोनुर्ली ग्रामस्थ व भाविक देवीचा गोंधळोत्सव एकत्र येत दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी गोंधळ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी भवानी देवीची विधीवत पूजा पार पडल्यानंतर दुपारी बकरा मानविण्याचा कार्यक्रम गावच्या प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर देवीचे दर्शन, ओटी भरणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रमांना सुरुवात झाली सायंकाळी चार वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली. यावेळी शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला. उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. रात्री गोंधळाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी प्रथेप्रमाणे मांडमांडावळ झाल्यानंतर गोंधळ घालण्याचा व देवीची मशाल फिरविण्याचा कार्यक्रम झाला. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी व ग्रामस्थ मंडळींनी गर्दी केली होती. हा कार्यक्रम तब्बल अडीच तास सुरू होता. गोवा-मुंबई येथील भाविक भक्तांसह राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील भाविकांनी उपस्थिती दर्शवित देवी भवानीचे दर्शन घेतले.

गोंधळ घालण्याच्या कार्यक्रमानंतर वालावलकर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग झाला. पहाटे पुन्हा गोंधळ घालणे व देवीची मशाल फिरविण्याचा कार्यक्रम झाला. देवीच्या अवसाराच्या कौलाने या उत्सवाची सांगता झाली. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या उत्सवासाठी मुंबई स्थित हिराप बंधू व ग्रामस्थ गावी दाखल झाले होते. गोंधळ उत्सवामुळे मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 24/Jan/2025