चिपळूण : येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेत्या आणि उपविजेत्या संघांनी हुल्लडबाजी केली. अटीतटीच्या सामन्यात दसपटी क्रीडा मंडळ विजेते ठरले, तर कोळकेवाडीचा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघांकडून मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली. धक्काबुक्की आणि एकमेकांवर खुर्चा फेकण्यात आल्याने आयोजकांनी या दोन्ही संघांना बाद ठरवून बक्षीस न देण्याचा निर्णय घेतला.
शहरातील पाग येथील श्रीकृष्ण युवक मंडळाच्यावतीने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. तीनदिवसीय कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील १२ नामवंत संघ सहभागी झाले होते. अखेरच्या दिवशी सोमवारी दोन उपांत्य फेरीचे सामने आणि एक अंतिम सामना होता. अंतिम फेरीसाठी दसपटी क्रीडा मंडळाचा कबड्डी संघ व वाघजाई कोळकेवाडीचा संघ समोरासमोर होता. मध्यंतरापर्यंत दसपटी कबड्डी संघाने पाच गुणांची आघाडी घेतृली होती. त्यानंतर ही आघाडी मोडीत काढण्यासाठी वाघजाई कबड्डी संघाने आक्रमक पवित्रा घेतला आणि २५ गुणांनंतर हा सामना अत्यंत चुरशीचा सुरू होता. एका गुणाच्या फरकाने परस्परविरोधी गुण मिळवले जात होते. अखेरच्या टप्प्यात कोळकेवाडी २८ आणि दसपटी २९ अशा गुणांनी हा सामना दसपटी क्रीडा मंडळाने जिंकला. यानंतर मात्र विजयाचा आनंद घेण्यापेक्षा येथील खेळाडूंनी हुल्लडबाजी केली. दोन्ही संघांचे समर्थक थेट कबड्डीच्या मैदानात घुसले आणि ढकलाढकली, हुल्लडबाजी, घोषणाबाजी करत वादावादीदेखील झाली. याचवेळी काहींनी खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला.
हा सगळा प्रकार घडत असताना श्रीकृष्ण युवक मंडळाने कडक भूमिका घेतली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विजेत्या व उपविजेत्या संघाला बाद ठरवून बक्षीस न देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे उपस्थित कबड्डी रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर संयोजकांनी या स्पर्धेतील तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या कबड्डी संघांना रोख बक्षिसासह सन्मानपत्र व चषक देऊन गौरवले.
या घटनेबाबत मंडळ जिल्हा कबड्डी असोसिएशन, तालुका कबड्डी असोसिएशनसह राज्य कबड्डी असोसिएशनपर्यंत अहवाल देणार आहे. अशा प्रकारे जर कोणी हुल्लडबाजी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त कबड्डी असोसिएशनने करावा, अशी मागणी करणार आहोत. मयूर भोजने, अध्यक्ष श्रीकृष्ण युवक मंडळ
कोणत्याही खेळामध्ये हार-जीत ही असतेच. विजय किंवा पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारायचा असतो. पाग येथे कबड्डीपटूंनी केलेली हुल्लडबाजी अत्यंत चुकीची आहे. स्पर्धा असावी मात्र त्यातून चुकीच्या गोष्टी घडू नयेत. शिस्त पाळली तरच खेळाडू घडतो. – सचिन कदम, माजी अध्यक्ष जिल्हा कबड्डी असोसिएशन
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 24/Jan/2025














