रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा दिल्यानंतर मत्स्य व्यावसायिक महिला, पुरुषांनी गुरुवारी (ता. २३) मत्स्यविभाग कार्यालयावर धडक दिली. अनधिकृत बांधकामे हटवण्यापूर्वी आम्हाला पर्यायी जागा या किंवा हटवण्यास आणखी आठ दिवसांची मुदत द्या, अशी मागणी केली; परंतु शासनाने या मागण्या फेटाळल्या, विकासकामाला यामुळे अडथळा येत असून, येत्या तीन दिवसांत (२७ जानेवारीपर्यंत) अतिक्रमण हटवा अन्यथा मत्स्यविभाग पोलिस बंदोबस्तात ती जमिनदोस्त करणार, असा अखेरचा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे.
मिरकरवाडा बंदराचा मत्स्य बंदर म्हणून विकास होत असताना मत्स्य विभागाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाचा याला अडसर येत आहे. टप्पा दोनचे काम लवकरच सुरू होणार आहे; परंतु मत्स्य विभागाने महसूल विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या सर्व्हेनुसार सुमारे ३११ अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या सर्वांना मत्स्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. आठ दिवसांत ही बांधकामे खाली करावीत, असे नोटिसीत होते; परंतु अजूनही यावर कारवाई झालेली नाही. दरम्यान, सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार असल्याने अतिक्रमण केलेले सर्व मत्स्य व्यावसायिक सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले. यावेळी महिला आणि पुरुष जमा झाले होते.
आम्ही वर्षानुवर्षे मिरकरवाडा बंदरात व्यवसाय करत आहे. अनधिकृत बांधकामे हटवण्यापूर्वी आम्हाला पर्यायी जागा द्यावी, त्यानंतरच बांधकामे हटवावीत, अशी मागणी केली. यावेळी मत्स्य विभागाचे उपआयुक्त महेश देवरे, सहायक आयुक्त आनंद पालव, आदी अधिकारी उपस्थित होते. याबाबत शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर शासनाने अनधिकृत बांधकामे असल्याने पर्यायी जागा देण्यास नकार दिला. अखेर व्यावसायिकांनी बांधकाम हटवण्यास आणखी ८ दिवसांची तरी मुदत द्यावी, अशी मागणी केली, ती देखील शासनाने फेटाळली, येत्या ३ दिवसांत सर्व बांधकामे हटवावीत, अन्यथा, मत्स्यविभाग कारवाई करून कारवाईचे पैसे वसूल करेल, असा अखेरचा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 25/Jan/2025














