चिपळूण : पोफळी नदी किनारी गॅबियन वॉलच्या उभारणीला सुरुवात

चिपळूण : नदी किनारी असलेल्या रस्त्यांना गॅबियन वॉलचा उत्तम पर्याय ठरत असून चिपळूण तालुक्यात आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी कळकवणे- आकले- तिवरे नदी किनारी रस्त्यावर पहिल्या टप्प्यात काम पूर्णत्वास गेले आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात देखील येत्या दोन महिन्यात कामाला सुरुवात होईल. दरम्यान चिपळूण-गुहागर -कराड मार्गावरील पोफळी नदीकिनारी गॅबियन वॉल बांधणीला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. या कामासाठी देखील आमदार शेखर निकम यांचे विशेष प्रयत्न राहिले आहेत. सदरील काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गणेश कन्स्ट्रक्शन कंपनीचे राजूशेठ पवार करीत आहेत.

चिपळूणमध्ये २१ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्ते, साकव, पूल यांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः नदीकाठाला असलेल्या रस्त्यांचे भराव वाहून गेल्याने रस्ते अरुंद झाले होते. या मार्गावर एकाचवेळी दोन-दोन वाहने आली तर मार्गस्थ होणे अवघड होत होते. यामुळे रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते. यातून गॅबियन वालचा पर्याय पुढे आला. यासाठी गेल्या वर्षी आमदार शेखर निकम यांच्या विशेष प्रयत्नातून चिपळूण तालुक्यातील पहिल्या टप्प्यात कळकवणे -आकले- तिवरे नदी किनारी असलेल्या रस्त्यासाठी गॅबियन वॉलसाठी निधी मंजूर झाला होता. सदरील काम पूर्णत्वास देखील गेले आहे. यातून रस्ता रुंदीकरण झालेच शिवाय भविष्यात रस्त्याचा भराव वाहून जाणार नाही, यादृष्टीने नियोजन झाले आहे.

तर याच धर्तीवर यावर्षी आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारातून गुहागर – चिपळूण-कराड मार्गावरील पोफळी येथे रस्त्यानजीक नदी किनारी गॅबियन वोलच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत बजेट २०२३-२४ अंतर्गत सुमारे दीड कोटींचा निधी मंजूर झाला आहे या गॅबियन वॉलची उंची १० मीटर तर काही ठिकाणी ११ मीटर असून लांबी ९० मीटर आहे. या गॅबियन वॉलमधून पावसाळ्यात रस्त्यावर आलेले पाणी यामधून झिरपून नदीत जाईल, अशी व्यवस्था होणार आहे. यामुळे रस्ता खचणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

*गॅबियन वॉल उभारणीचा प्रदीर्घ अनुभव- श्री राजू पवार*

याबाबत गणेश कन्स्ट्रक्शन कंपनीचे राजूशेठ पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गॅबियन वोल उभारणीचा आपल्याला प्रदीर्घ अनुभव असून गेल्या काही वर्षात महाबळेश्वर, सातारा, वाई, पन्हाळा या मार्गावरील घाट रस्त्यांना गॅबियन वॉल उभारणीचे काम करण्यात आले आहे. गेल्या वर्षी दुर्गेवाडी व आकले कळकवणे तिवरे रस्त्यावर गॅबियन उभारण्यात आली. तर आता यावर्षी चिपळूण- गुहागर -कराड मार्गावरील पोफळी येथे गॅबियन वॉलच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाच्या निधीसाठी आ. शेखर निकम यांनी विशेष प्रयत्न केले आहेत, अशी माहिती राजू पवार यांनी यावेळी दिली. आजपर्यंत उभारण्यात आलेल्या गॅबियन वोलना कोणताही धोका पोहोचलेला नाही. उलट घाट रस्ता असो अथवा नदी किनारी असलेल्या रस्त्यांना गॅबियन वोलचा उत्तम पर्याय ठरला आहे, अशी माहिती राजू पवार यांनी यावेळी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 25-01-2025