मंडणगड : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबडवे या महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीकरिता प्रजासत्ताकदिनी बेमुदत उपोषणास बसले आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे यावेळी या उपोषणकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी जाहीर केले. दरम्यान, दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती ढासळली, त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी प्रशासनाद्वारे पाठवण्यात आले.
या विषयासंदर्भात शिक्षेकतर कर्मचारी, देणगीदार जमीन मालक सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, नीलेश सकपाळ, उदय जाखल, सुजाता सकपाळ, विनीत सकपाळ, प्रीती तांबे, प्रफ्फुल तांबे, राजेंद्र राऊत, रमेश सकपाळ, सौरव सकपाळ, प्रशांत सकपाळ, अक्षय सकपाळ हे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपोषणास बसले आहेत. आंबडवे येथे झालेल्या महाविद्यालयास गावातील ग्रामस्थांनी देणगी रूपाने १३.५० एकर मोफत जागा उपलब्ध करून दिली. असे असताना मुंबई विद्यापिठाने ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. देणगीदारांपैकी सात कुटुंबातील व्यक्तींना कामावर घेण्यात आले. अद्याप सहा कुटुंबातील व्यक्तींना रोजगार देण्यात आलेला नाही. सर्व कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामावर घेण्यात आले.
त्यांना कामावर कायम करण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही, तर ठोक पद्धतीने वेतन दिले जाते. विद्यापीठाने दिलेल्या या वागणुकीच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवूनही सेवेत कायम करणे, नियामाप्रमाणे वेतन देणे, व मागील फरकाची वजावट देणे या तीन मागण्यासाठी विद्यापिठाचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी
गतवर्षीच्या जानेवारीपासून चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर अमलबजावणी झाली नाही.
आज होणार बैठक
प्रशासनाच्या वतीने २७ रोजी समन्वयक दीपक रावेरकर व मंडळ अधिकारी प्रकाश साळवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठाकडून आलेले पत्र त्यांना वाचून दाखवले. पत्रात नमूद केल्याप्रमाणे आज (ता. २८) दुपारी कुलगुरू यांनी यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित केली असून उपोषणकर्त्यांना बोलवले आहे. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 28/Jan/2025














