दापोली : आशापुरा कंपनीच्या मायनिंगमुळे उंबरशेत येथील विहिरींचे पाणी दूषित

दापोली : दापोली तालुक्यातील उंबरशेत या ठिकाणी आशापुरा कंपनीकडून उत्खनन सुरू आहे. यामुळे तेथील सार्वजनिक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या ठेकेदारांना जाब विचारला असता ठेकेदार धमक्या देतात, अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी उपोषणादरम्यान अधिकाऱ्यांसमोर मांडली. दि. २६ जानेवारी रोजी उंबरशेत येथील ग्रामस्थ कंपनीच्या या दंडेलशाहीबाबत उपोषणाला बसले होते.

२००५ पासून या भागात आशापुरा मायनिंग कंपनीकडून उत्खनन सुरू आहे. यामुळे येथील निसर्गसंपदा धुळीत मिळाली आहे, असे उपोषणकर्ते ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे तर १९ वर्ष आम्ही कंपनीचा जुलूम सहन करतोय, असे म्हणणे देखील या वेळी ग्रामस्थांनी मांडले आहे. ज्या ठिकाणी आशापुरा मायनींग कंपनीकडून उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा आहे. हे पाणी आजुबाजूच्या गावांना मिळावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, याबाबत शासन विचाराधीन दिसत नसून पाणी टंचाई काळात दापोलीतून टँकरने पाणी पुरविले जात आहे, अशी शोकांतिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

कंपनीचे ओव्हरलोड धावणारे डंपर यामुळे संपूर्ण गाव धुळीने माखले आहे. शाळकरी मुलांना, ग्रामस्थाना दररोज धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे तर कंपनीचे कामकाज तत्काळ थांबवून शासनाने आता तरी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी उंबरशेत येथील ग्रामस्थांनी उपोषणातून केले आहे.

जिथे पाणी आहे तिथे कंपनीकडून उत्खनन
केंद्र शासनाने ‘जलजीवन मिशन’ ही महत्त्वाकांक्षी योजना सर्वत्र राबवली आहे. या योजनेतून गाव, वाड्या टंचाईमुक्त होतील, अशी संकल्पना या योजनेची आहे. मात्र, या योजनेसाठी उंबरशेत परिसरामध्ये विहीर खोदण्यासाठी जागा सापडत नाही, अशी शोकांतिका या गावाची आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी कंपनीचे उत्खनन सुरू आहे. यामुळे शासन उंबरशेत गावाला न्याय देईल का, अशी विचारणा या उपोषणानंतर होत आहे.

Happy journey marathi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 29/Jan/2025