रत्नागिरी : संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा कलगीतुरा चालू असताना मात्र रत्नागिरीत वेगळे उदाहरण पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आपल्या पादचा राजीनामा देत पक्ष सोडला व शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. यानंतर तातडीने ठाकरे शिवसेने कडून तालुकाप्रमुख पदी शेखर घोसाळे यांची निवड केली. मागील अनेक वर्ष साळवी स्टॉप येथील शाखेतून बंड्या साळवी आपले कामकाज करीत होते. याच शाखेतून मी यापुढे देखील नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याची भूमिका बंड्या साळवी यांनी घेतली. आज या शाखेत येऊन मी शुभेच्छा स्वीकारणार आहे असे ठाकरे शिवसेनेचे नूतन तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी सांगितल्यावर मात्र राजकीय वर्तुळात साऱ्यांना उत्सुकता लागली होती. याच शाखेत जात शिवसेनेचे बंड्या साळवी यांनी शेखर घोसाळे यांना शुभेच्छा दिल्या आणि यापुढे देखील मी याच ठिकाणी बसून नागरिकांच्या समस्या सोडविण असे सांगितले. दोन्ही पक्षांच्या नावात शिवसेना हा शब्द आहे. राजकीयदृष्ट्या जरी आम्ही वेगळे असलो तरी आम्ही दोघे याच शाखेत बसून जनतेचे प्रश्न सोडवणार अशी भूमिका आता बंड्या साळवी यांनी मांडली आहे.













