कामथे कदमवाडी पाणीप्रश्न सामंजस्याने सोडवा : आ. भास्कर जाधव

चिपळूण : तालुक्यातील कामथे येथे कदमवाडीसाठी गेली दोन-अडीच वर्षे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील खासगी विहीर कोसळल्यामुळे कदमवाडी ग्रामस्थांचा पाणीप्रश्न उपस्थित झाला असून, या संदर्भात तोडगा काढण्यासाठी आ. भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी कार्यालयात ग्रामस्थ व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधित जागा मालक आणि ग्रामस्थांनी हा विषय सामंजस्याने सोडवावा आणि ग्रामस्थांची पाण्याची सोय करावी, अशी सूचना आ. जाधव व प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केली. त्यावर सर्वांनी सहमती दर्शवत लवकरच हा विषय मार्गी लावण्याचा निर्णय केला.

कामथे कदमवाडीमध्ये महेश व दशरथ खेडेकर यांची वडिलोपार्जित विहीर आहे. गेली अनेक वर्षे कदमवाडी आणि तांबडवाडीतील ग्रामस्थ याच विहिरीवरून पाणी घेत होते. मात्र, तांबडवाडी ग्रामस्थांना शासकीय योजनेतून पाण्याची व्यवस्था झाली. कदमवाडी ग्रामस्थांची गैरसोय झाली. मात्र, ही विहीर दशरथ खेडेकर यांच्या सातबारा उताऱ्यावर आहे. त्यामुळे खासगी विहीर असल्याने शासकीय योजना राबविता येत नाही असा प्रश्न निर्माण झाला. परंतु या विहिरीवर सन २००२ मध्ये शासकीय खर्च झालेला आहे. विहीर खोलीकरण, पंपघर, पाईपलाईन, विहिरीची दुरूस्ती अशाप्रकारे शासकीय खर्च या विहिरीवर पडला आहे. शिवाय कदमवाडी ग्रामस्थांना या विहिरीचे पाणी वापरण्यास आपली कोणतीही मनाई नाही, असे दशरथ खेडेकर यांनी सांगितले तर ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच हरी कासार यांनी विहिरीची एक ते दीड गुंठा जागा बक्षीसपत्र करावी, त्यावर दशरथ व महेश खेडेकर तयार झाले. मात्र, या जागेचा मोबदला मिळावा. शिवाय ज्यावेळी आपल्या शेती व पिण्यासाठी पाण्याची गरज लागेल, त्यावेळी या विहिरीतून आपल्याला देखील पाणी मिळावे, अशी अट त्यांनी घातली. त्यावर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी, बक्षीसपत्र करताना खेडेकर यांची मागणी त्यामध्ये नमूद करावी व त्यांनी तशी अट घालावी. ग्रामस्थांनी त्यांच्या जमिनीचा मोबदला द्यावा आणि शासकीय निधीतून या विहिरीची डागडुजी करून योजना राबवावी, असे सुचविले. अखेर या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले.

यावेळी आ. भास्कर जाधव यांनी, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक कामासाठी किंवा अनेक वर्षे एखादी विहीर किंवा जागा वापरात येत असेल तर ती शासनाच्या नावाने होते, हा पर्याय आहे. मात्र, हे प्रकरण सामंजस्याने सोडविले तर उत्तम. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना मोबदला देऊन सामंजस्याने बक्षीसपत्र करून घ्यावे, असे सुचविले. या बैठकीला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, संभाजी खेडेकर, नाना महाडिक उपस्थित होते.

बीडीओ धारेवर…
कामथे कदमवाडी पाणीप्रश्नासंदर्भात आ. भास्कर जाधव यांच्या सूचनेनुसार बैठक लावण्यात आली होती. त्याचे निमंत्रण संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते. मात्र, या बैठकीला गटविकास अधिकारी घारगे-पाटील या उशिराने दाखल झाल्या. यामुळे आ. भास्कर जाधव संतापले. बीडीओच उशिरा येणार असतील तर अधिकारी कसे येणार? असा सवाल त्यांनी केला आणि प्रांताधिकारी यांना या बाबत नोटीस काढण्यास सांगितले. या बैठकीला चिपळूण पं. स. च्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने आ. जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर बैठक संपताना संबंधित अधिकारी हजर झाले. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 30/Jan/2025