चिपळूण : शंकरवाडी-मुरादपूर भागातील पूर संरक्षक भिंतींच्या कामाला गती

चिपळूण : अतिवृष्टीत वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात शिरणाऱ्या शंकरवाडी-मुरादपूर भागातील नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी आता पूर संरक्षक भिंत उभारली जात आहे. जलसंपदा विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी ही भिंत उभी करण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे या कामाला गती आली असून बुधवारी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता नाईक यांच्यासह अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

शहरामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडा बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्वी केले होते; परंतु २००५च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. महापुरातही मोठा फटका या भागासह शहराला बसला. यामुळे या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने होत होती. त्या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी पावसाळ्यापूर्वी येथील संरक्षक भिंत उभारणीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

चिपळुणातील मिलिंद खातू यांच्या प्रीमियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट चिपळूण या कंपनीला या कामाचा ठेका मिळाला आहे. २३ डिसेंबर २०२४ रोजी आमदार निकम यांच्या हस्ते नलावडा बंधारा पूरसंरक्षक भिंत कामाचे भूमिपूजन पार पडले होते. गेल्या दीड महिन्यापासून ही भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाशिष्ठी किनारी २०० मीटर लांबी व ९ ते १० मीटर उंचीची ही भिंत आहे. पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प माग लावावा, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 30/Jan/2025