रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्याकडे मंत्र्यांचे वेधले जाणार लक्ष

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रत्नागिरीतील मच्छीमार विनंती करणार आहेत. पर्ससीननेटसह ट्रॉलिंग मच्छीमार नौकामालक या संदर्भात नियोजन करत आहेत. मिरकरवाडा बंदर आता मोकळे झाले असून त्याठिकाणचे पथदीप गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. तसेच बंदरावर स्वच्छतागृहाची सोय नाही, याकडेही मंत्र्यांचे लक्ष वेधले जाणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

मिरकरवाडा समुद्र किनारी ड्रोन कॅमेऱ्याची गस्त सुरु झाल्यानंतर ट्रॉलिंग नौका मालकांची फारच अडचण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात १० वाव च्या आता मासेमारी करणाऱ्या ट्रॉलिंग नौकांचे ड्रोनद्वारे छायाचित्र टिपले जात असून, त्यातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. बुरंडी समुद्रात ५ वावापर्यंत समुद्रात मासेमारी करण्याची मुभा आहे, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले जाणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

समुद्रात १० वावापर्यंत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलिंग नौकांकडून प्रामुख्याने कोळंबी पकडली जाते. इतर मासळी फारच कमी प्रमाणात जाळ्यात अडकते. त्यामुळे १० वावाची मर्यादा बदलून मिळावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे. पर्ससीननेट नौकांचा मासेमारी कालावधी वाढवून मिळावा, यासाठीही मच्छीमार आग्रही आहेत. त्याचबरोबर मच्छीमारांसंदर्भात शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक व्हायची. या बैठका बंद असून त्या सुरु व्हाव्यात, यासाठीही दोन्ही मंत्र्यांना विनंती केली जाणार आहे.

मिरकरवाडा बंदरावरील सर्व अतिक्रमण हटवण्यात आले आहे. त्यामुळे मासे खारवणे आणि सुकवण्यासाठी पर्यायी जागा मिळावी, यासाठी मच्छीमारांकडून ना. उदय सामंत आणि ना. नितेश राणे यांना विनंती करण्यात येणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

Gim trainer

चार नौकामालकांना ४ लाख ८० हजारांचा दंड
रत्नागिरीच्या मिरकवाडा समुद्रात ड्रोन कॅमेऱ्याने अवैध मासेमारी करणाऱ्या १५ नौका टिपल्या आहेत. यातील ४ नौका मालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. सहायक मत्स्यव्यवसाय विभागाने ४ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ड्रोनने टिपलेल्या गिलनेट नौकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 31/Jan/2025