सावर्डे : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली नेत्रपेढी येथील वालावलकर रुग्णालयात स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा या रुग्णालयात असल्यामुळे अंध व्यक्तींना हे एक वरदान ठरणार आहे.
संपूर्ण जगात १९०५ मध्ये पहिली नेत्र पटल प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. असे असले तरीदेखील नेत्रदानाचा तुटवडा हा अजूनही कायम आहे. भारतातील पहिली नेत्रपेढी १९४८ मध्ये स्थापन झाली, तरीही सर्वसामान्य जनतेच्या जनजागृती आणि पुढाकाराच्या अभावामुळे अंध व्यक्तीपर्यंत याचा लाभ म्हणावा तसा पोहोचत नाही. जंतुसंसर्ग, डोळ्याला अपघाताने इजा, दीर्घ काळ कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर, “अ” जीवनसत्वाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे डोळ्याच्या बुबुळाचे पटल खराब होऊ शकते. त्यामुळे अंधत्व येते. अशा रुग्णांसाठी वालावलकर हॉस्पिटलमध्ये अंधत्व रोखण्यासाठी नेत्र पटल प्रत्यारोपण सुविधा सुरू करण्यात आली आहे.
ही नेत्रपेढ़ी दान केलेल्या डोळ्याच्या उतींचे संकलन, जतन आणि वितरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. हे नेत्रपटल हे अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे काम करेल. नैसर्गिक मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार नेत्रदान करता येते, त्याकरिता स्त्री, पुरुष, वय, धर्म, जात याचे कोणतेही बंधन आवश्यक नाही. नेत्र हे उपलब्ध झाल्यास ताबडतोब अंध व्यक्तीला शस्त्रक्रियेद्वारे नवीन नेत्र बसवता येते आणि संबंधिताला नवीन दृष्टी प्राप्त होते. वालावलकर हॉस्पिटल अंध व्यक्तींना वरदानच ठरणार आहे.
सुसज्ज नेत्रपेढी
नेत्र विभागात पूर्वतयारी कक्ष, समुपदेशन कक्षासह आय बँक व्यवस्थापकासाठी रूम, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पेक्युलर मायक्रोस्कोप, शीतकपाटगृह आदी सुविधांनी सुसज्ज असा हा विभाग कोकणवासीयांच्या सेवेत रुजू झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 01/Feb/2025














