रत्नागिरी : नांदिवडेतील गॅस टर्मिनल प्रकल्पाचे लोकवस्तीतून स्थलांतर करण्याची मागणी

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जयगडनजीकच्या नांदिवडे गावात गेल्या डिसेंबर महिन्यात वायू गळतीची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाधित झाले होते. त्यामुळे संपूर्ण नांदिवडे गावातील तसेच जयगड परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले होते. वायूगळतीमुळे जयगड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी बाधित होण्याची घटना घडल्यानंतर आता थेट २६ जानेवारीच्या ग्रामसभेत गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत नांदिवडे गावच्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रुप ग्रामपंचायत नांदिवडे येथे झालेल्या या ग्रामसभेमध्ये लोकवस्तीतून गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतर व्हावा, यासाठी सभागृहामध्ये जनसागर लोटला होता. यावेळी नांदिवडे कार्यक्षेत्रालील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.

या ग्रामसभेत असे सांगण्यात आले की, नांदिवडे गावात अवघ्या १०० ते २५० मीटर अंतरावर वाडीवस्त्यांमध्ये जिंदल कंपनी गॅस टर्मिनल उभारत आहे. तसेच आजुबाजूला काही अंतरावर संदखोल, सांडेलावगण, जयगड, साखरमोहल्ला, कचरे, चाफेरी गावे आहेत.

आधीच राखेच्या व कोळश्याच्या धुळीने तसेच विविध आजाराने ग्रस्त असलेला नांदिवडे गाव व परिसर असताना त्यात आणखी हे महाभयानक संकट येऊन ठेपले आहे. तसेच १२ डिसेंबर २०२४ ला गॅस वायूगळतीमुळे सुमारे १०० विद्यार्थी बाधित झाले. शिवाय भोपाळ गॅस वायूगळती प्रकरण तसेच जगभरातील अनेक बातम्या पाहता नांदिवडे ग्रामस्थांनी एकमताने गॅस टर्मिनल प्रकल्प लोकवस्तीतून स्थलांतर करावा व सध्या सुरु असलेले काम बंद करावे, असाही ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेत जनसुनावणी न घेता प्रशासनाने कोणत्या निकषावार प्रकल्पाला परवानगी दिली, अशी शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली. त्यानंतर याची प्रशासनाने दखल घ्यावी व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 03/Feb/2025