प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक : सोहम घोरपडे

सावर्डे : प्लास्टिक ही जगाची समस्या बनली आहे. प्लास्टिकमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे पण आजच्या दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर ही गरज आहे. यासाठी योग्य नियोजन करून प्लास्टिकचा कमी वापर, पुनर्वापर, पुनर्निर्मिती व विघटन या बाबी समाजाने अंगीकारल्या तरच याचे थोडेफार परिणाम कमी होऊ शकतात. प्लास्टिकमुळे पर्यावरण नाश पावत आहे. यामुळे प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे, असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रचे प्रकल्प अधिकारी सोहम घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणचे प्रमुख भाऊ काटदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहम घोरपडे यांचे प्लास्टिक मुक्ती, सेंद्रिय खत व कचरा वर्गीकरण या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर सह्याद्री निसर्ग मित्रचे प्रकल्प सहाय्यक आयुष महाडिक, सह्याद्री
आयटीआयचे प्राचार्य उमेश लकेश्री, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावळी मार्गदर्शनात व्याख्याते सोहम घोरपडे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून प्लास्टिकमुळे पर्यावरणातील प्राणी, पक्षी व इतर परिसंस्थांवर झालेला परिणाम विद्यार्थ्यांपुढे सुलभ भाषेत मांडला.

प्लास्टिकचे विविध प्रकार, त्याचा वापर, परिणाम आणि विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही या परिसंवादामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करावा, प्लास्टिक रिसायकलला देण्याच्या पद्धती काय आहेत याची माहिती देऊन सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था आपल्या प्रशालेतून प्लास्टिक कचरा ताब्यात घेणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 04/Feb/2025