मत्स्यपालनामध्ये वैशिष्ठपूर्ण कामगिरीबद्दल सुदेश मयेकर यांचा केंद्र शासनाकडून गौरव

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केला सत्कार

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनासाठी केंद्र सरकार विविध विभागात कार्यरत असणार्‍यांना दिल्लीत बोलावून त्यांचा सन्मान केला. रत्नागिरीतील मत्स्य व्यावसायिक सुदेश मयेकर यांना महाराष्ट्रातून उपस्थित राहण्यासाठी संधी मिळाली. केंद्र शासनाच्या मत्स्य विभागातर्फे सुदेश मयेकर यांचा गौरवही करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी विविध विभागातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्ती व संस्थांना दिल्लीमध्ये केंद्र शासनाने बोलावून त्यांचा सत्कार केला होता. मत्स्य व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या मच्छीमार व व्यावसायिकांना देशभरामधून निमंत्रण पाठवण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातून चौघांची निवड करण्यात आली होती. यामध्ये एका महिला मच्छीमाराचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या चारमध्ये रत्नागिरीतील मत्स्य व्यावसायिक व कोळंबी शेती उत्पादनात वेगळा ठसा उमटवणारे माजी उपनगराध्यक्ष सुदेश मयेकर यांचाही समावेश होता. ते पत्नी अ‍ॅड. समृध्दी सुदेश मयेकर यांच्यासह दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रामधून निवडण्यात आलेल्यांमध्ये सुदेश मयेकर यांची निवड झाल्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सागरी मच्छीमारी, मत्स्य पालन व संधर्वन, त्याचप्रमाणे गोड्या पाण्यातील मच्छीमारी अशा वेगवेगळ्या पध्दतीने मत्स्य उत्पादन करण्यात येते. रत्नागिरीमध्ये मत्स्य व्यावसायिक सुदेश मयेकर यांनी कोळंबी शेतीमध्ये जास्तीतजास्त उत्पादन घेत, कोळंबी शेती करणार्‍यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या याच कामाची दखल केंद्र शासनाने घेतल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:49 AM 05/Feb/2025