गुहागर : गुहागर आगार विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. आगारातून जुन्याच बसेस चालवण्यात येत असून चालक, वाहकांची पदेही रिक्त आहेत. नव्या बसची मागणी होत असताना अद्याप एकही बस आगाराला मिळालेली नाही. तसेच लांब पल्ल्याच्या बसही बंद असून, आगाराच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होत आहे.
आगाराकडे ६२ बस असून, गेली कित्येक वर्षे या बसेसमध्ये वारंवार बिघाड होत आहे. गतवर्षी १५ नव्या गाड्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र, एकही नवीन गाडी मिळालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भाग वगळता स्थानिक फेऱ्या कमी केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या फेऱ्या भारमानाचे कारण देत बंद आहेत. केवळ बोरीवली व पुणे मार्गावर प्रत्येकी दोन बसफेऱ्या सुरू आहेत. तुळजापूर, अक्कलकोट, विजापूर बसफेऱ्या हंगामी चालवल्या जातात. मात्र रत्नागिरी विभागातून आदेश येताच त्या फेऱ्या बंद केल्या जातात.
गुहागर-पनवेल ही सध्या एकच वातानुकुलित बस चालवण्यात येते. तालुक्यातील अनेक चाकरमानी वसई, नालासोपारा, विरारमध्ये स्थायिक आहेत. मात्र, गुहागर आगाराकडून या भागासाठी एकही बसफेरी नाही. केवळ बोरीवली मार्गावर बसफेरी सुरू आहे. याचे कारण विरार येथे चालक-वाहकांसाठी विश्रांती व्यवस्था व्यवस्थापनाकडून नसल्याचे सांगण्यात आले.
या बाबत आगारप्रमुख अशोक चव्हाण यांना विचारले असता, नव्या गाड्यांचा प्रस्ताव नव्या बसेसची मागणी केलेली आहे. मात्र अद्याप बस मिळालेल्या नाहीत. कर्मचारी संख्याही कमी असून, त्यांच्यावर कामाचा ताण असला तरी प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न ते करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. शेजारच्या दापोली तालुक्याला १५ नवीन बस मिळाल्या मात्र गुहागर अद्यापही प्रतीक्षेत आहे. शैक्षणिक सहली व इतर प्रासंगिक करारासाठी बस सोडण्यात येतात. तेव्हा बस तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
९१ चालक, ११६ वाहकांची पदे रिक्त
सध्या गुहागर आगारात ७५ चालक, तर ४७ वाहक कार्यरत असून, ९१ चालक व ११६ वाहक कमी आहेत. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे सेवेवर याचा परिणाम होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 05/Feb/2025














