शिक्षकांची छडी समजून घ्यावी : आ. शेखर निकम

चिपळूण : आपण सावर्डे येथील प्राथमिक शाळेतच शिकलो. या शाळेत आल्यानंतर आपल्याला अनेक मित्रांची आठवण झाली. त्या वेळेचे शिक्षक खूप मारायचे. आपण याच शाळेत शिकलो. त्यावेळी शिक्षण सभापती म्हणून स्व. गोविंदराव निकम होते. त्यामुळे त्यांना या शाळेत भेट देण्याची विनंती केली. ते या शाळेला भेट देण्यासाठी आले. मात्र, त्यांची पाठ फिरल्यानंतर येथील शिक्षिकेने तेवढ्याच ताकदीने विद्यार्थ्यांना छडी दिली, इतके स्वातंत्र्य त्यावेळी शिक्षक़ांना होते. त्यामुळे पालकांनी आज समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी आपल्या सावर्डे येथील जि. प. मराठी कॉलनी शाळेत एका कार्यक्रमाप्रसंगी केले.

सावर्डे कॉलनी जि. प. मराठी शाळेच्या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले, त्यावेळी येथील मयेकर बाई या खूपच मारायच्या. माझ्या मित्रांनीसुद्धा त्यांचा अनेकदा मार खाल्ला होता. त्यांची तक्रार आम्ही साहेबांकडे केली होती. मात्र, त्यानंतर ज्या मुलांनी तक्रार केली त्यांना तेवढ्याच ताकदीने छडी मिळाली. ती आठवण आजही आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांप्रती इतके नाजूक बनण्याची गरज नाही. शेवटी शिक्षकांची छडीदेखील समजून घेतली पाहिजे. सगळेच शिक्षक एकसारखे नसतात, असे आ. निकम यांनी सांगितले. यावेळी शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष विकास नलावडे, माजी विद्यार्थी देवराज गरगटे उपस्थित होते. सूत्रसंचालन संदेश सावंत व मान्यवरांचे स्वागत प्रा. सावंत व मोहिते यांनी केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवर्तक भोसले, प्रिया विचारे, प्रकाश राजेशिर्के, विनायक सावंत, नाना सावंत, भरत सावंत, बबन सावंत व ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 05/Feb/2025