दापोली : तालुक्यातील मांदिवली येथील मायनिंग प्रकल्प हा जन सुनावणीपासूनच वादाच्या भोवर्यात सापडला आहे. ऑक्टोबर 2023 रोजी या प्रकल्पाबाबत झालेली जनसुनावणी स्थानिकांच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आली होती; मात्र, त्यानंतर येथील स्थानिकांच्या भावना समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकदाही स्वारस्य दाखवले नाही, अशी खंत देखील येथील नागरिक व्यक्त करत आहेत. जनसुनावणी न झालेल्या मांदिवली मायनिंग प्रकल्पावर शासन एवढे मेहरबान का?असा सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
फेर जनसुनावणी न होता 3 जानेवारी 2025 रोजी मांदिवली येथील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला शासनाची पर्यावरण पूरक मंजुरी मिळाली आहे. मात्र मागील पंधरा महिने या प्रकल्पाला विरोध करणार्या स्थानिकांच्या भावनांचा विचारात न घेता हा प्रकल्प लादला जात आहे. असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. जन सुनावणी न झालेल्या या प्रकल्पावर शासनाची एवढी मेहरबानी का? इथल्या भूमिपुत्रांना आणि शेतकर्यांना देशोधडीला लावून हा प्रकल्प नेमका कुणाच्या फायद्यासाठी राबवला जात आहे. असे एक ना अनेक प्रश्न येथील ग्रामस्थांच्या उठावानंतर समोर येत आहेत.
येथील भावेश कारेकर हे शेतकर्यांच्या आणि नागरिकांच्या बाजूने उभे राहून लढा देत आहेत. या प्रकल्पातून होणारे मोठ्या प्रमाणातील उत्खनन, वृक्षतोड आणि रोजचे शेकडो वाहतूक करणारे डंपर यामुळे येथील लोकांच्या घराला गेलेले तडे, परिसरात पसरलेले धुळीचे साम्राज्य, प्रकल्पामुळे प्रदूषित झालेले जलस्त्रोत, परिसरातील रस्ते आणि पुलाची झालेले दुरवस्था, पारंपरिक शेती आणि बागायतींवर झालेले दुष्परिणाम यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या धुळीचा त्रास इथल्या लहान मुलांच्या आरोग्यावर होत असून, याचे दूरगामी परिणाम पुढल्या काही दिवसात दिसून येणार आहेत. मायनींग मुळे दुबार शेती करणे लोकांनी सोडून दिले आहे.
उपोषण करूनही पदरी निराशाच
मांदिवली येथील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला स्थगिती मिळावी आणि इथली निसर्ग संपदा टिकून राहावी यासाठी ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी उपोषणही केले. मात्र ग्रामस्थांच्या पदरात निराशा पडली आहे. निसर्गसंपन्न असणारे मांदिवली हे गाव मायनिंगच्या विळख्यातून वाचवा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
येथील शेतकर्यांनी पावसाळी भातशेतीनंतर उन्हाळ्यात वांगी, वाल-पावटा, तूर, कलिंगड ही पिके घेणे सोडून दिले आहे. या प्रकल्पामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. – भावेश कारेकर, मांदिवली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 06-02-2025














