गुहागर : पोलीस पाटलांचे मानधन रखडले

गुहागर : राज्य सरकारने पोलीस पाटलांचे थकीत मानधन देण्यासाठी ३९ कोटी ६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला, तसे पत्रही पोलीस पाटलांच्या संघटनेला ६ जानेवारीला दिले. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम पोलीस पाटलांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेली नाही.

नोव्हेंबर व डिसेंबर अशा दोन महिन्यांचे पोलीस पाटलांचे मानधन रखडले गेले आहे. राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ केली मात्र दुसरीकडे मानधन रखडलेले आहे.

राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनात एप्रिल २०२४ मध्ये वाढ केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत मानधन देण्यात आले. परंतु नोव्हेंबर २०२४ पासून अद्यापि जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या खात्यावर मानधन जमा झालेले नाही. जिल्ह्यात सुमारे पंधराशे महसुली गावे आहेत. तेथे एकूण सुमारे ९ ८० पोलीस पाटील कार्यरत आहेत. गावांच्या तुलनेत पोलीस पाटलांची संख्या कमी आहे. पोलिस पाटील हे शासन, प्रशासन व जनता यामध्ये दुवा म्हणून काम करतात. गावात शांतता व सुव्यवस्था ठेवणे, गावात घडणाऱ्या घटना , घडामोडींची माहिती वेळोवेळी पोलीस व महसूल प्रशासनाला देणे, सामाजिक उपक्रम, उत्सवात प्रशासनाला मदत करतात.

ऑक्टोबरपर्यंत वेळेत यापूर्वी पोलीस पाटलांना ७५०० रुपये मानधन दरमहा दिले जात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाने पोलीस पाटलांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला . एप्रिल २०२४ पासून वाढीव मानधन लागू करण्यात आले. हे वाढीव मानधन ऑक्टोबरपर्यंत नियमित मिळाले. परंतु, त्यानंतर पोलीस पाटलांच्या खात्यावर ते जमा करण्यात आलेले नाही. मानधनासाठी निधी उपलब्ध करण्यात आल्याचे पत्र राज्य राज्य सरकारचे संघटनेला दिले. मात्र त्यानंतरही पोलीस पाटलांच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा झालेली नाही.

गावांचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलिस पाटलांची रिक्त पदे भरावीत, त्यांना विमा संरक्षण द्यावे, निवृत्तिवेतन लागू करावे , याबरोबरच पोलीस पाटलाना दरमहा नियमित मानधन मिळावे, अशी मागणी आहे. परंतु प्रत्येक वेळी दोन ते तीन महिने मानधन दिरंगाईने मिळत आहे. जिल्ह्यातील गावांच्या तुलनेत पोलिस पाटलांची संख्या कमी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 06-02-2025