रत्नागिरी : शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करताना कृषी परिसंस्था बदलू नका. त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.
कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृह सभागृहात ५९ व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक गटसभेत ते बोलत होते. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे (नवी दिल्ली) माजी सहाय्यक महासंचालक डॉ. नारायण जांभळे, हैदराबादच्या यइक्रिसॅटचे माजी उपमहासंचालक डॉ. अरविंदकुमार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विस्तार परिषद सदस्य विलास म्हात्रे, सहयोगी संशोधन संचालक आणि भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे उपस्थित होते. यावेळी डॉ. भावे म्हणाले, भाताखालील जमिनीची किंमत जास्त असून, शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालावरून भातपीक गरिबीकडून समृद्धीकडे वाटचाल करत आहे. विद्यापीठाचे बियाणे कमी पडल्याने स्थानिक वाण शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्यासाठी शास्त्रज्ञांनी बीजोत्पादन वाढवण्याची गरज आहे.
डॉ. जांभळे म्हणाले, विविध प्रदेशांच्या गरजेनुरूप जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषकतत्त्वे अधिक असलेल्या भातजाती विकसित करून गरिबी निर्मूलनासाठी भात हे व्यावसायिक पीक होण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी भातक्षेत्र कमी न करता उत्पादन वाढवणे, संकरित बीजोत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा करून उत्पादन वाढवणे, तसेच ‘स्पीड ब्रीडिंग’, ‘जिनोम एडिटिंग’, ‘सिंथेटिक अपोमिक्सिस’सारख्या नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक उपाय अमलात आणण्यासाठी जागतिक स्तरावर विचार केला पाहिजे. बाहेरील सुरक्षेसोबत भातउत्पादक शेतकऱ्यांची आंतरिक सुरक्षा अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाची आहे. अन्य पिकांना ज्याप्रमाणे शासकीय स्तरावरून भरघोस सुविधा दिल्या जातात, त्याच धर्तीवर भाताला राजाश्रय मिळायला हवा, असे मत डॉ. भावे यांनी मांडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 07-02-2025














