चिपळूण : विद्याभारती गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

चिपळूण : शिरळ (ता. चिपळूण) येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन चिपळूण येथे उत्साहात पार पडले.

कार्यक्रमासाठी मिमिक्री व डबिंग आर्टिस्ट, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक युवा कलाकार शैलेश इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सोबत टीजेएसबी बँकेच्या चिपळूण शाखेचे व्यवस्थापक प्रवीण गवळी, संस्थेच्या कार्यवाह छायाताई मुसळे, विद्याभारती रत्नागिरी जिल्हाध्यक्षा प्रा. सोनाली खर्चे उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी घोषपथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करण्यात आले. शैलेश इंगळे यांनी आपली कला सर्व उपस्थितांसमोर सादर केली. प्रवीण गवळी यांनी गुरुकुलच्या कृतीयुक्त व अनुभवाधारित शिक्षण पद्धतीमुळे चिपळूणच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडेल, असे गौरवोद्गार काढले.

Shiva optical

संगीत हा गुरुकुलचा एक आयाम आहे. त्यानुसार मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात ‘नमन नटवरा’ नांदीने झाली. गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना गायन आणि तबलावादनाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात काही गीतांचे सादरीकरण केले. तबलावादनदेखील करून दाखवले. सरस्वती शिशुमंदिर व शिरळच्या शिशुवाटिकेतील विद्यार्थ्यांनी अनेक सुंदर नृत्यांचे व शिक्षण पद्धतीतील प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांमध्ये नाटिका सादर केल्या. गुरुकुलमध्ये दिवसाची सुरुवात योगाने होते. या कार्यक्रमामध्ये चौथी ते नववीमधील विद्यार्थिनींनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आसाममधील बिहू या लोकनृत्यप्रकाराचे सादरीकरण, अफजलखान वध पोवाडा, रंगिलो मारो ढोल ना अशा अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता भारतीय पारंपरिक खेळ मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 10-02-2025