भारतरत्न पांडुरंग काणेंच्या साहित्याचे मराठीत रूपांतर करणार : प्रो. हरेराम त्रिपाठी

रत्नागिरी : रत्नागिरीत तीन दिवस क्षेत्रीय वैदिक संमेलनामुळे भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला मदत होणार असून यातून अनेकजण प्रेरणा घेतील. ज्यांचे नाव संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राला ज्यांचे नाव दिले आहे, ते भारतरत्न पां. वा. काणे यांच्या समग्र साहित्याचे मराठी रूपांतर करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाईल. पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वैदिक संमेलन आयोजित करण्याचा विचारही केला जाईल, असा विश्वास रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

उज्जैन येथील महर्षि सान्दोपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कवी कुलगुरू संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र यांच्यावतीने माधवराव मुळये भवन येथे तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक मिलनाच्या समारोप झाला. त्यावेळी कुलगुरु प्रो. त्रिपाठी बोलत होते. या वेळी संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, वेद पाठशाळेचे अध्यक्ष आनंद मराठे समारंभाला उपस्थित होते.

श्री. त्रिपाठी म्हणाले, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी संमेलनाला दिलेल्या भेटीत आश्वासक वक्तव्य केले. कोणत्याही उपक्रमाला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वेद विद्या विभागाचे प्रमुख अमित भार्गव यांनी तीन दिवसांच्या संमेलनाचा आखावा घेतला. संमेलन महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील वेदाचार्य सहभागी झाले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थववेद या चारही वेदांच्या विविध शाखांमधील विद्वानांनी आठ तास पारायण केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ, संस्कृत पाठशाळा, वेदपाठशाळा आणि माधवराव मुख्ये भवनात पारायण करण्यात आले. समारोपावेळी सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. स्वरूप काणे यांनी सूत्रसंचालन केले. रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी आभार मानले.

रत्नागिरीला मोठी परंपरा
त्या रत्नागिरीत यावेळचे संमेलन भरले आहे, त्या रत्नागिरीलाही मोठी परंपरा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यलढ़याला दिशा देतानाच समृद्ध भारतीय वेदपरंपरेचाही खूप अभ्यास केला आहे. मॅक्समुल्लर यांनी वेदांच्या निर्मितीचा कालखंड ख्रिस्तानंतर दोनशे-अडीचशे वर्षाचा असल्याचे सांगितले होते. मात्र टिळकांनी सखोल अभ्यास करून वेदांची निर्मिती ख्रिस्तापूर्वी चार हजार वर्षे झाल्याचे ओरायन या ग्रंथाच्या आधारे सिद्ध केले आहे. अशा आपल्या भारतीय समृद्ध वेदपरंपरेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा, असे आवाहन प्रो. त्रिपाठी यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 10/Feb/2025