चिपळूण : शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुककोंडीवर उत्तम पर्याय ठरणाऱ्या पेठमाप मुरादपूर पुलाच्या कामाने गती घेतली असून फेब्रुवारी अखेर या पुलाचे काम पूर्ण होईल. मात्र, अॅप्रोच रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून त्यानंतर खऱ्या अर्थाने या पुलाचे काम पूर्णत्वास जाणार आहे.
चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर हे दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेले आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहोटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आताही काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात. परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग देखील बंद पडतो. साहजिक पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा, अशी मागणी नागरिक कित्येक वर्ष करीत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी पेठमाप-मुरादपूर असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. या कामासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.
गेल्या सुमारे दीड वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. या पुलाची उंची सुमारे साडे सात मीटर, लांबी २२५ मीटर, १४ पिलर, २ अब्युटमेंट तर या पुलावर एकूण 60 गर्डर चढविण्यात आले आहेत. आता या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असून फेब्रुवारी अखेर पूर्ण होईल, असा विश्वास ठेकेदार कंपनीने व्यक्त केला आहे.
लोकप्रतिनिधीसह नागरिकांनी या पुलाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन अॅप्रोच रोडचे देखील काम पूर्णत्वास जाऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या कामासाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून ६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. अप्रोच रोडचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर खऱ्या अर्थाने हा पूल सुरू झाल्यास मुरादपूर, पेठमाप, दादर मोहल्ला, बेबल मोहल्ल्यासह शहरातील बहुतांशी भाग जोडला जाणार आहे त्यांतून शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 10/Feb/2025












