चिपळूण : कोळकेवाडी येथील जलजीवन मिशन योजनेतील सुरू असलेल्या खोदाईला, जलशुध्दीकरण प्रकल्पाला कोणतीही परवानगी नाही. तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात असेल तर यापुढे आम्हीही अनधिकृत बांधकामे उभी करू, असा इशारा कोळकेवाडी, नागावे ग्रामस्थांनी रविवारी झालेल्या बैठकीत कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाला दिला आहे.
कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे अडरे, अनारी परिसरातील २२ गावांसाठी पाणी योजना राबविवली जात आहे. त्यासाठी खोदाई कोळकेवाडी धरण व्यवस्थापन अंतर्गत असलेल्या जागेत आणि दरडप्रवण क्षेत्रात केली जात आहे. या खोदकामामुळे तेथील वाड्या वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खोदकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी कोळकेवाडी ग्रामपंचायतीने कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केले गेल्याने उपसरपंच सचिन मोहिते व माजी सरपंच नीलेश कदम यांनी पुढाकार घेत या समस्येला वाचा फोडल्यानंतर रविवारी कोळकेवाडी ग्रामपांयतीमध्ये नागावे ग्रामस्थांसमवेत बैठक झाली.
गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जीवन प्राधीकरण विभागाने खोदाईचे काम तात्पुरते थांबवण्यात येत असल्याचे ग्रामस्थांना सांगितले होते. त्यानुसार काम बंदही होते. मात्र, रविवारपासून ते पुन्हा सुरू झाल्याने या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. प्रकल्पासाठी आम्ही ग्रामस्थांनी जमिनी दिल्या. आज स्थानिकांकडे पुरेशा जमिनी शिल्लक नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे विविध प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नाही. शासनाची कोणतेही योजना राबवायची झाली तर कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडून जागा उपलब्ध केली जात नाही. त्यामुळे अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सहकार सेवा सोसायटी आदी कामे थांबलेली आहेत. असे असतानाही गावात मात्र परिसरातील पाणी योजनेसाठी जलशुध्दीकरण प्रकल्प, पाईपलाईन खोदाईसाठी जागा दिली जाते.
स्थानिकांना मात्र कोणतेही सहकार्य धरण व्यवस्थापन हे करीत नाही. मुळात या योजनेच्या सुरू असलेल्या कामाला धरण व्यवस्थापनाकडून कुठलीही परवानगी नाही. ग्रामपंचायतीने तक्रार केली, काम थांबवण्यास सांगितले तरीही अधिकारी लक्ष देत नाहीत. जर अनधिकृतपणे सुरू असलेल्या कामाला धरण व्यवस्थापनासह शासकीय विभाग सहकार्य करत असेल तर यापुढे धरण व्यवस्थापनाच्या अंतर्गत असलेल्या आमच्या जमिनीवर आम्हीही बांधकामे उभारणार असल्याचा इशारा या बैठकीत उपस्थितांनी दिला आहे.
यावेळी कोळकेवाडी सरपंच श्रीकांत निगडे, उपसरपंच सचिन मोहिते, माजी सरपंच नीलेश कदम, शरद शिंदे, दत्ताराम बंगाल, रमेश बंगाल, तंटामुक्त समिती अध्यक्ष गोविंद कदम, नारायण पानगले, प्रकाश कदम, जयदेश शिंदे, हरिश्चंद्र मोरे, प्रकाश पोरे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 11/Feb/2025














