गुहागर : ई-कचऱ्याच्या पुनर्वापरामुळे देशाचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे सुटे भाग आयात करण्यावरील खर्च कमी होतो. त्यातून देशाचे परकीय चलन वाचते. म्हणजेच आपल्या देशाच्या सेवेसाठी आपला हातभार लागतो. त्यामुळे ई कचरा संकलन अभियान गुहागर तालुक्यातील ग्रामस्थांनी यशस्वी करावे, असे आवाहन गुहागर पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले. चिखली येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत ते बोलत होते.
तालुक्यातील चिखली येथे झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत ई-कचरा संकलनासंदर्भात आढावा घेण्यात आला. गटविकास अधिकारी म्हणून भिलारे यांनी नव्याने पदभार स्वीकारला आहे.
यावेळी उपस्थिततांकडून आलेल्या प्रश्नांबाबत मयुरेश पाटणकर यांनी माहिती दिली. या विषयाचा समारोप गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केला. ते म्हणाले की, सध्या देशात आपण माझी वसुंधरा अभियान राबवित आहोत. आपल्या वसुंधरेला ज्याप्रमाणे प्लास्टिकपासून धोका आहे. त्याचप्रमाणे ई कचऱ्यापासूनही धोका आहे. अनेक नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या परसबागेत, नदी-नाल्यांमध्ये टाकून देतो किंवा मोहापायी त्या घरातच अनेक वर्षे पडून राहातात. मात्र हे आरोग्यासाठी, वसुंधरेसाठी अयोग्य आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील अनेक भागांचे विघटन संथगतीने होते.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील सर्कीट पॅडवर विविध चिप्स चिकटविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण वापरले जाते. या दोन्ही गोष्टीमधून बाहेर पडणारे सूक्ष्म कण विषारी असतात. ते आपली वसुंधरा विषारी बनवतात. शिवाय ई कचऱ्यांतील अनेक छोटे भाग शिसे, पारा, कॅडियम आदी ज्या मुलद्रव्यापासून बनतात, ती मूलद्रव्ये भारतात मिळत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात बनल्या तरी त्यासाठी आवश्यक छोटे इलेक्ट्रॉनिक भाग भारताला परदेशातून आयात करावे लागतात, त्यासाठी मोठे परकीय चलन खर्च होते.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी केळस्कर यांनी ई कचरा संकलनासंदर्भात लवकरच गाव पातळीवरील सूक्ष्म नियोजनासाठी एक एसओपी दिली जाईल. ग्रामपंचायत, शाळा आदी गावस्तरावरील शासकीय कार्यालयांतील ई-कचरा निर्लेखन प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार कार्यालयातील कचरा ई संकलनात घ्यावा, अशी सूचना यावेळी केली.
२५ फेब्रुवारीला तालुक्यातून ई-कचरा संकलन
या बैठकीत अभियानाविषयीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ग्रामसेवक संघटनेने देखील हे अभियान ग्रामपातळीवर यशस्वी करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे सांगितले. यावेळी मयुरेश पाटणकर यांनी १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत गावामधील वाड्यांतर्गत ई-कचरा संकलनाची केंद्र तयार करावीत. यामध्ये संकलीत झालेला कचरा २३ फेब्रुवारीला ग्रामपंचायत स्तरावर एकत्र करावा. दि. २४ व २५ फेब्रुवारीला तालुक्यातील ई-कचरा संकलीत केला जाईल, अशी माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 11/Feb/2025














