संतांकडून उत्तम जीवनकौशल्यचे समुपदेशन : रोहिणी माने परांजपे

रत्नागिरी : तुमच्यावर आमच्यावर संतांचे धोर उपकार आहेत. आपल्याकडे ज्ञानेश्वरी, २१ समासी दासबोध आहे. दासबोध, हरिपाठ तर प्रत्येकाने खिशात बाळगावा. यातून जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तरुणांनी वाचण्याचा ग्रंथ आहे. उत्तम जीवनकौशल्य व भरकटलेल्या पिढीला मार्गावर आणण्यासाठी हे वाचणे आवश्यक आहे. संतांइतके समुपदेशनाचे काम कोणीही केलेले नाही, असे प्रतिपादन कीर्तनचंद्रिका रोहिणी माने परांजपे यांनी केले.

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, खल्वायन आयोजित शरद अनंत पटवर्धन स्मृतीनिमित्त गजर कीर्तनाचा या वारकरी कीर्तनात त्या बोलत होत्या. त्यांना गायनसाथ गायनाचार्य गोरख महाराज गतीर, कुंदन महाराज बोरसे, मृदुंगसाथ मृदुंगाचार्य चेतन महाराज तरे, ऑर्गन कौस्तुभपरांजपे आणि तबलासाथ निखिल रानडे यांनी केली. कीर्तनाला हाऊसफुल्ल गर्दी झाली.

संत मुक्ताईचा महिमा रोहिणीताईंनी सांगितला. वैफल्याने संत ज्ञानेश्वर चिडतात. सोपानदेव, निवृत्तीनाथ त्यांना समजवतात; परंतु मुक्ताई ज्ञानादादासाठी ताटी उघडी ज्ञानेश्वरा असे म्हटले. परकाया प्रवेशाची सिद्धी असल्याने मुक्ताई ज्ञानोबांचा प्राण अडवून धरतात, असे चरित्रात लिहिले आहे. आपण पावनमनाचे योगी आहात. तुम्हाला चिडता येणार नाही, असे मुक्ताईंनी सांगितले. ज्ञानेश्वर व भावंडांच्या माता-पित्यांनी देहांत प्रायश्चित घेतले. हा प्रसंग रोहिणीताईंनी इतका सुरेख रंगवला की, श्रोत्यांच्या डोळ्यातून धारा लागल्या.

श्रोत्यांनी चपला ठेवल्या बाजूला
वारकरी कीर्तन असल्यामुळे प्रेक्षागृहातील रसिक श्रोत्यांनाही रोहिणीताईंनी आपल्या चपला काढून ठेवण्यास सांगितले. लगेच सर्वांनी चपला बाजूला काढल्या. वारकरी भजनात सर्व श्रोते न्हाले. टाळ्या वाजवत भजनात तल्लीन झाले. या कीर्तनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

‘संयुक्त राष्ट्र परिषदेने ठरवलेल्या शाश्वत विकासध्येयांपैकी एक म्हणजे (क्र. १६) शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी गजर कीर्तनाचा हा कार्यक्रम आयोजित केला. रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल खूप खूप आनंद वाटतोय-‘ नंदकुमार पटवर्धन, संस्थापक संचालक, आसमंत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 11/Feb/2025